Big Bash League In India: सध्या भारतात टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतात आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरू होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना महिनाभर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल. आयपीएल ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे. यासह ऑस्ट्रेलियात खेळवली जाणारी बिग बॅश लीग स्पर्धा देखील जगातील लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेतही जगभरातील अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसून येत असतात. दरम्यान बिग बॅश लीगचा सलामीचा सामना भारतात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियातील दोन वरिष्ठ अधिकारी चेन्नईत आले होते. बिग बॅश लीग स्पर्धेतील सलामीचा सामना चेन्नईत आयोजित केला जाऊ शकतो का, याचा अंदाज घेण्यासाठी हे दोन्ही अधिकारी चेन्नईत आल्याची माहिती समोर येत आहे. भारतात क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. या क्रिकेट चाहत्यांना बिग बॅश लीग स्पर्धेकडे आकर्षित करण्यासाठी हा ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लॅन आहे. पण हे मुळीच सोपं नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अनेक परवानगी घ्यावी लागणार आहे. बीसीसीआय यासाठी अनुमती देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर पर्थ स्कॉर्चर्सचा संघ चेन्नईला सामना खेळण्यासाठी जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी देखील या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात रस दाखवला आहे. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठ्या लीग स्पर्धांपैकी एक आहे. जगभरात सुरू असलेल्या इतर लीग स्पर्धांमध्ये भारतातील उद्योजकांनी संघ खरेदी केले आहेत. पण बिग बॅश लीग स्पर्धेत एकही भारतीय उद्योजकाने संघ खरेदी केलेला नाही. त्यांना आकर्षित करण्यासाठी हा प्लॅन आहे.
याआधी २०२५-२६ मध्ये झालेल्या स्पर्धेत पर्थ स्कॉर्चर्स संघाने बाजी मारली होती. अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या स्पर्धेत पर्थ स्कॉर्चर्सने सिडनी सिक्सर्सचा ६ गडी राखून पराभव केला होता. यासह पर्थ स्कॉर्चर्सचा संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला.

