Australia Cricket Team, 2028 Olympics: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा सुपर ८ फेरीत पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला. तर झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ पहिल्यांदाच सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरला आहे. टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लॉस एंजिलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी कोणता संघ पात्र ठरणार हे टी-२० टीम रँकिंगच्या आधारे ठरवले जाणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फ्लॉप कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या टी-२० रँकिंगमध्ये घसरण होणार हे तर निश्चित आहे. जर न्यूझीलंडचा संघ सेमीफायनल किंवा त्याहून पुढे गेला, तर हा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा पुढे जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता ही जरा वेगळी असणार आहे. आयसीसी प्रत्येक खंडातील अव्वल संघाची थेट ऑलिम्पिकसाठी निवड करू शकते. आयसीसीने टी-२० वर्ल्डकपनंतरच्या रँकिंगला थेट पात्रतेसाठी कट ऑफ मानले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर आयसीसीने हा निर्णय कायम ठेवला आणि ऑलिम्पिक समीतीनेही हा नियम लागू केला. तर मग ऑस्ट्रेलियाची सुट्टी होऊ शकते. न्यूझीलंडचा संघ थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल, तर ऑस्ट्रेलियाला पात्रता फेरीतील सामने खेळून यावं लागेल.
आयसीसीकडून प्रत्येक खंडातील टॉपला असलेल्या संघाला अंतिम ६ मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आशिया खंडातून भारताचा संघ पात्र ठरणार हे तर निश्चित आहे. तर आफ्रिका खंडातून दक्षिण आफ्रिका आणि यूरोपमधून इंग्लंडचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतो. या स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेकडे आहे. त्यामुळे अमेरिकेचा देखील या स्पर्धेत समावेश केला जाऊ शकतो. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या प्रत्येकी ६-६ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. पण जर ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत थेट प्रवेश करू शकला नाही. तर ऑस्ट्रेलियाला पात्रता फेरीतील सामने खेळून स्पर्धेत प्रवेश मिळवावा लागणार आहे.

