Kane Richardson Retirement: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू केन रिचर्डसनने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. केन रिचर्डसन हा ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे. २०२१ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यावेळी रिचर्डसनने देखील ऑस्ट्रेलिया संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याला ऑस्टेलियासाठी २५ वनडे आणि ३६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या केन रिचर्डसनने २००८-०९ मध्ये झालेल्या हंगामात लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ५ वर्षांनंतर त्याला ऑस्ट्रेलियासाठी पहिला वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. रिचर्डर्सनला ऑस्ट्रेलियासाठी फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. पण देशांतर्गत क्रिकेट आणि बिग बॅश लीग स्पर्धांमध्ये तो सक्रिय होता. त्याने बिग बॅश लीग स्पर्धेतील ६ हंगामांमध्ये एडिलेड स्ट्रयकर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर २०२५-२६ हंगामात त्याला सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.
बिग बॅश लीग स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेत गोलंदाजी करताना त्याने आतापर्यंत १४२ गडी बाद केले आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे. केनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी २००९ मध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हापासून ते आतापर्यंत मी या खेळासाठी सर्वकाही केलं आहे. आता माझ्या आयुष्यातील इतक्या सुंदर प्रवासाचा समारोप करण्याची हीच योग्य वेळ आहे.” केन रिचर्डसन ३४ वर्षांचा आहे. शरीर साथ देत नसल्याने आणि या वयात वेगवान गोलंदाजी करणं कठीण असल्याने त्याने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.
तसेच त्याने पुढे लिहिले की, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला माझ्या देशासोबतच जगभरातील अनेक फ्रँचायझींकडून आणि ऑस्ट्रेलियातही खेळण्याची संधी मिळाली. मी नेहमीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली. मला आशा आहे की चाहत्यांना हे माहीत असेल की, मी लहानपणी जेव्हा डार्विनमध्ये होतो, तेव्हापासूनच क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते.”
