Usman Khawaja Retirement From International Cricket: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव टाकला जात होता. दरम्यान निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याने माजी खेळाडूंबाबत मोठे खुलासे केले आहेत.

पाचव्या कसोटी सामन्याला येत्या ४ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान २ जानेवारीला त्याने पत्रकार परिषद घेतली आणि निवृत्तीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेवेळी त्याची पत्नी रेचल देखील उपस्थित होती. अॅशेस मालिका सुरू होण्यापूर्वी ख्वाजाच्या पाठीला दुखापत झाली होती. याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरही दिसून आला. यादरम्यान त्याला खूप काही ऐकवलं गेल्याचा खुलासा त्याने पत्रकार परिषदेत केला आहे. यासह इतर खेळाडूंना मिळणारी वागणूक आणि त्याला मिळणारी वागणूक ही वेगळी असल्याचंही ख्वाजाने सांगितलं.

पत्रकार परिषदेत बोलताना ख्वाजा म्हणाला, “मला आधीपासून खूप वेगळं असल्यासारखं वाटायचं आणि अजूनही तसंच वाटतंय. माझ्या मते, ऑस्ट्रेलियाचा हा संघ सर्वोत्तम संघ आहे. मला खूप अभिमान आहे. पण आदराच्या (सन्मानाबाबात) बाबतीत मला खूप वेगळं वाटलं आहे. मला जी वागणूक दिली गेली आणि ज्या प्रकारे गोष्टी घडल्या, ते खूप वेगळं होतं.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्या पाठीला दुखापत झाली होती, ही अशी गोष्ट आहे जी माझ्या हातात नव्हती. पण माजी खेळाडूंनी आणि माध्यमांनी माझ्यावर जी टीका केली, ती मी २ दिवस सहन करू शकलो असतो. पण मी ५ दिवस सहन केलं. विशेष म्हणजे, ही टीका माझ्या कामगिरीबद्दल नव्हतीच.”

“माझ्यावर अनेकदा वैयक्तिक टीका करण्यात आली. ही टीका मी सामन्याआधी तयारी कशी करतोय याबाबत होती. ज्याप्रकारे ते भाष्य करत होते, ते खूप वैयक्तिक होतं. ‘तो फक्त स्वत:चा विचार करतो, सामन्याच्या एक दिवसाआधी तो गोल्फ खेळतो, ‘तो स्वार्थी आहे..’, ‘तो फार मेहनत घेत नाही’, ‘तो आळशी आहे’, अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. या गोष्टी रुढिवादी होत्या. या गोष्टींचा मी आयुष्यभर सामना केला आहे.” असं उस्मान ख्वाजा म्हणाला.