Australia Eliminated From ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३२ वा सामना झिम्बाब्वे आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये होणार होता. पण २ तास वाट पाहूनही पाऊस न थांबल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. या एका गुणासह झिम्बाब्वेने सुपर ८ फेरीत प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात होणारा सामना हा ऑस्ट्रेलियासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ओमानविरूद्ध विजय मिळवूनही झिम्बाब्वेच्या दोन्ही सामन्यातील पराभवाची वाट पाहायची होती. पण झिम्बाब्वेचा संघ सामन्याचा निकाल न येताच आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत प्रवेश करणारा सातवा संघ ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाचा फ्लॉप शो!
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचा नेहमीच दबदबा पाहायला मिळत असतो. पण यावेळी असं काही घडलेलं नाही. खेळाडूंनी नावाला साजेशी कामगिरी न करणं आणि प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होणं, हे ऑस्ट्रेलियाच्या अपयशाचं प्रमुख कारण आहे. पण टी-२० फॉरमॅटमध्ये अनुभवापेक्षा, मिळालेल्या संधीचं सोनं कोण करतं, हे महत्वाचं ठरतं. जो संघ १२० चेंडूंमध्ये चांगली कामगिरी करतो, तो विजयाचा मानकरी ठरतो. पण ऑस्ट्रेलियाकडून तसा खेळ पाहायला मिळाला नाही. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला तर हरवलं, पण झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला सुपर ८ मध्ये प्रवेश करण्यासाठी झिम्बाब्वेवर अवलंबून राहावं लागलं. पण पाऊस झिम्बाब्वेच्या मदतीला धावून आला आणि या सामन्यातील एकही चेंडू न खेळता झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ फेरीत दाखल झाला.
झिम्बाब्वेचा सुपर-८ मध्ये प्रवेश
तर झिम्बाब्वे संघासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण झिम्बाब्वेने पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. झिम्बाब्वेने या स्पर्धेतील ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. तर १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ ५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेने जर पुढील सामना गमावला, तर झिम्बाब्वेचा संघ ७ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचू शकतो.

