Jamie Overton Injury: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. लवकरच प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोण? हे चित्र स्पष्ट होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाकडेही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. त्यासाठी चेन्नईला इथून पुढील सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धा संपत आली, पण चेन्नई सुपर किंग्स संघाचं दुखापतीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. स्पर्धेच्या सुरुवातीलाच एमएस धोनी दुखापतग्रस्त झाला होता, तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यानंतर स्टार फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त होऊन, संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. आता चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर असताना, संघातील प्रमुख गोलंदाजाला दुखापतग्रस्त झाल्यामुळे मायदेशी परतावं लागलं आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाला या हंगामात नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जर चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थन मिळवायचं असेल, तर पुढील ३ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. दरम्यान वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटन दुखापतग्रस्त झाला असून मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो पुढील सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाही. स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यावर जेमी ओव्हरटनसारखा अनुभवी गोलंदाज संघाबाहेर होणं, हा चेन्नई सुपर किंग्सला बसणारा सर्वात मोठा धक्का आहे.

जेमी ओव्हरटनने या हंगामातील १० सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना आतापर्यंत १४ गडी बाद केले आहेत. त्याने विकेट्स तर काढून दिल्या आहेत, पण यादरम्यान तो महागडा ठरला असून त्याने ८.८९ च्या सरासरीने धावा खर्च करुन दिल्या आहेत. गोलंदाजीसह त्याने फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं आहे. धोनी एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यामुळे धोनीच्या जागी अशा एका खेळाडूची गरज होती, जो शेवटी येऊन मोठे फटके खेळू शकतो. ही जागा जेमी ओव्हरटनने भरून काढली आहे. त्यामुळे त्याला क्रिकेट चाहत्यांनी परदेशी थाला म्हणजेच धोनीचा उत्तराधिकारी असं नाव दिलं होतं. चेन्नई सुपर किंग्सने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे की, तो दुखापतीवर उपचार घेण्यासाठी मायदेशी परतला आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की,तो प्लेऑफच्या सामन्यांसाठीही परतण्याची शक्यता कमी आहे.