Ayush Mhatre Ruled Out Of IPL 2026: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पण गेल्या ३ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवून चेन्नईने दमदार पुनरागमन केलं आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघातील प्रमुख फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो ३ आठवड्यात संघात पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण आता तो थेट स्पर्धेतून बाहेर झाल्याची माहिती मिळत आहे. आता चेन्नई सुपर किंग्ज उर्वरित सामन्यांसाठी कोणाला संघात स्थान देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरमहन दरम्यान संघात आधीपासून एक असा फलंदाज आहे, जो आयुष म्हात्रेसारखीच तुफान फटकेबाजी करतो.
आयुष म्हात्रे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, आता उर्विल पटेलला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. उर्विल पटेलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने अवघ्या २८ चेंडूत वेगवान शतक झळकावलं होतं. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्विल पटेलला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळत नव्हतं. पण आता आयुष म्हात्रे संघाबाहेर झाल्यानंतर उर्विल पटेलला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयुष म्हात्रेने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता. फिजियो आले, तपासणी केली, त्यानंतर त्याने फलंदाजी करणं सुरू ठेवलं. पण त्यानंतर तो लवकर बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत या स्पर्धेत ६ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर ४ सामान्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा पुढील सामना २३ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
