Khaleel Ahmed Injury: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल २०२६ स्पर्धेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर पुढील दोन्ही सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाची गाडी रुळावर परतली आहे. सर्वकाही सुरळीत सुरु असताना चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाला सर्वात मोठा धक्का

चेन्नई सुपर किंग्ज संघाला स्पर्धा सुरु होताच २ मोठे धक्के बसले होते. स्पर्धा सुरु होण्याआधीच एमएस धोनी दुखापतग्रस्त झाला होता. तो अजूनही संघात परतलेला नाही. तर डेवाल्ड ब्रेव्हिसही दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याने नुकताच पुनरागमन केलं आहे. आता चेन्नईचा संघ ज्या गोलंदाजावर अवलंबून होता, तो गोलंदाज स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २८ वर्षीय खलील अहमद हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वात मोठा धक्का आहे. पण चेन्नई सुपर किंग्ज आणि आयपीएलकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान शेवटचे षटक टाकत असताना त्याला हॅमस्ट्रींगचा त्रास झाला होता. माध्यमातील वृत्तानुसार, त्याची दुखापत गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत त्याला फार विकेट्स घेता आलेल्या नाहीत. पण तो सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांवर दबाव टाकण्याचं काम करत आहे. या हंगामात गोलंदाजी करताना त्याने ५ सामन्यांमध्ये २ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने १०१ चेंडूंमध्ये १४६ धावा खर्च केल्या आहेत. ८.६७ च्या इकोनॉमिने धावा खर्च करताना २४ धावा देऊन १ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

खलील अहमदला आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ७६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. २०१८ मध्ये त्याला या स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. २०१८ पासून ते आतापर्यंत त्याने एकूण ९१ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने २१ धावा खर्च करून ३ गडी बाद केले आहेत. आतापर्यंत त्याला दिल्ली डेअरडेव्हिल ,सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.