Ayush Mhatre, CSK: आयपीएल स्पर्धेत ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नईचा संघ एक एक विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. एकीकडे खेळाडूंचा फॉर्म तर दुसरीकडे खेळाडूंची दुखापत, हे समीकरण चेन्नईची पाठ सोडत नाहीये. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच एमएस धोनी दुखापतग्रस्त झाला. तो आतापर्यंत एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस दुखापतग्रस्त झाला होता. आता फॉर्ममध्ये असलेला आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त झाल्याने चेन्नई सुपर किंग्जच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात आयुषने चांगली सुरुवात करून दिली होती. पण ५ व्या षटकात त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. त्यामुळे काही वेळ तो फलंदाजी करू शकला नाही. फिजिओ आले आणि तपासणी केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा फलंदाजी सुरू केली. पण तो स्वस्तात बाद झाला. आता तो ३ आठवडे आयपीएल स्पर्धेतून बाहेर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आयुषने गेल्या काही सामन्यांमध्ये चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली होती. पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना त्याने ७३ धावांची खेळी केली होती. तर दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३८ धावांची खेळी केली होती. हैदराबादविरुद्ध धावांचा पाठलाग करताना त्याने चांगली सुरुवात करून दिली होती. पण दुखापतीचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर जाणवला.
आयुष म्हात्रे ३ आठवड्यांसाठी बाहेर…
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आयुष म्हात्रे दुखापतीमुळे ३ आठवडे संघाबाहेर राहणार आहे. सध्या चेन्नईचा संघ तळाशी आहे. असं असताना आयुष म्हात्रे संघाबाहेर होणं हा चेन्नईसाठी सर्वात मोठा धक्का आहे. तो ३ आठवड्यांसाठी संघांबाहेर राहणार आहे. त्यामुळे आता तो थेट १० मे नंतर खेळताना दिसेल. चेन्नईने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, यादरम्यान २ सामने जिंकले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
