Matheesha Pathirana Injury: आयपीएल २०२६ स्पर्धा येत्या २८ मार्च पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने होणार आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. पण काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा चांगलाच फटका बसला आहे. आता कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाही.
मथिशा पथिराना हा कोलकाता नाईट रायडर्स संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. तो दुखापतीतून पूर्णपणे ठीक होऊ शकलेला नाही. त्यामुळे तो एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत संघासोबत जोडला जाऊ शकतो. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा हेड कोच अभिषेक नायरने ही माहिती दिली आहे.
अभिषेक नायरने २० मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत, मथिशा पथिरानाच्या दुखापतीबाबत अपडेट दिली. कोलकाता नाईट रायडर्स संघाची टीम मॅनेजमेंट श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असल्याची माहिती अभिषेक नायरने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो दुखापतीतून सावरत आहे. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे तो एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संघासोबत जोडला जाऊ शकतो.
मथिशा पथिरानाच्या दुखापतीबाबत अपडेट देताना अभिषेक नायर म्हणाला, “मथिशा पथिराना सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत असून तो रिहॅब करत आहे. आमची चर्चा झाली असून, तो एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे फिट होऊ शकतो. आतापर्यंत आम्हाला बोर्डाकडून इतकीच माहिती मिळाली आहे.” कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर हर्षित राणा देखील दुखापतग्रस्त आहे. तो खेळू शकण्याची शक्यता खूप कमी आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मथिशा पथिरानाला १८ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे. गेल्या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून आला होता. या हंगामात त्याने दमदार कामगिरी केली होती.
