Akash Deep Ruled Out: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध होणार आहे. तर स्पर्धेतील दुसरा सामना ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज आकाश दीप दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

आकाश दीप दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर होणं, हा कोलकाता नाईट रायडर्सला बसणारा आणखी एक मोठा धक्का आहे. कारण, संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो या स्पर्धेत खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आकाश दीपवर १ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. आकाश दीप संघात आल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचं वेगवान गोलंदाजी आक्रमण मजबूत झालं होतं. पण आता तो ही स्पर्धा खेळू शकणार नाहीये.

माध्यमातील वृत्तानुसार, तो लंबर स्ट्रेस इन्श्यूरीने त्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या तो बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये आहे. कोलकाता नाईट रायडर्सने इडन गार्डन्सच्या मैदानावर सराव सुरू केला आहे. पण आकाश दीप या सराव सत्रात सहभाग घेऊ शकला नव्हता. कोलकाता नाईट रायडर्स संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी हर्षित राणा देखील दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यासह संघातील आणखी एख प्रमुख वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे तो स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडे वेगवान गोलंदाज म्हणून उमरान मलिक, कार्तिक त्यागी आणि वैभव अरोरासारखे वेगवान गोलंदाज आहेत. आता आकाश दीप स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ त्याच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, नवदीप सैनी, सिमरजीत सिंग आणि आकाश मधवालसारखे खेळाडू शर्यतीत आहेत.