Rachin Ravindra: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या अजिंक्य रहाणेला आयपीएल २०२६ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पण कोलकाताचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पुढील सामने जिंकून कोलकाताचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. कोलकाताचा पुढील सामना गुजरात टायटन्स संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी कोलकाताचा स्टार खेळाडू रचिन रवींद्र मायदेशी परतला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने रचिन रवींद्र मायदेशी जात असल्याची माहिती दिली आहे. केकेआरकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटलं गेलं आहे की, “रचिन रवींद्र आगामी कसोटी मालिकेचा सराव करण्यासाठी मायदेशी परतला आहे.” कोलकाता नाईट रायडर्सने २०२६ मध्ये झालेल्या लिलावात त्याला २ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. पण या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करणारा रचिन रवींद्र हा फलंदाजीत टॉप ऑर्डरमध्ये वेगाने धावा काढून देऊ शकतो. यासह फिरकी गोलंदाजी करुन विकेट्सही काढून देऊ शकतो. पण कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला सातत्याने संधी दिली. आयपीएलमध्ये एका वेळी ४ परदेशी खेळाडूंना संधी दिली जाते, त्यामुळे रचिन रवींद्रला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. येत्या काही दिवसात न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरूद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रचिन रवींद्र कसोटी संघातील प्रमुख फलंदाज आहे. त्यामुळे त्याला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरूद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना ४-८ जूनला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना १७ ते २१ जूनदरम्यान द ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा सामना २५ ते २९ जूनदरम्यान नॉटिंगहॅमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत २ सामने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. याआधी झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यात रचिन रवींद्रने १६५ धावांची दमदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यातही त्याने १७६ धावा चोपल्या होत्या. आता इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
