Jasprit Bumrah Injury Update: आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार येत्या २८ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा सुरू व्हायला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. सर्व संघांनी स्पर्धेच्या दृष्टीने कसून सराव करायला सुरूवात केली आहे. काही संघांच्या सराव सामन्यांमध्ये फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत. त्यामुळे यावेळी सर्व संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार, यात काहीच शंका नाही. दरम्यान स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच मुंबई इंडियन्स संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने वानखेडे स्टेडियमवर सराव करायला सुरूवात केली आहे. जवळपास सर्वच खेळाडू संघासोबत जोडले गेले आहेत. पण संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही संघासोबत जोडला गेलेला नाही. माध्यमातील वृत्तानुसार, बुमराह बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध खेळणार आहे.

/

जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये आहे. पण तो तिथे नेमका का गेला आहे, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तो दुखापतग्रस्त आहे की चेकअपसाठी गेला आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण बुमराहसारखा संघातील प्रमुख गोलंदाज अजूनही संघासोबत जोडला गेला नसल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेत जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत गोलंदाजी करताना १२ सामन्यांमध्ये १७.५६ च्या सरासरीने आणि ६.६८ च्या इकोनॉमिने १८ गडी बाद केले होते. यावेळी बुमराहला ट्रेंट बोल्ट, दिपक चाहर आणि अल्लाह गफनजरसारख्या वेगवान गोलंदाजांची साथ मिळणार आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ:

रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, नमन धीर, शार्दुल ठाकूर (ट्रेड), शेरफन रूदरफोर्ड (ट्रेड), मयंक मार्कंडे (ट्रेड), क्विंटन डीकॉक दीपक चहर, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, दानिश मलेवार, मोहम्मद इझहर