Rachin Ravindra Retirement: येत्या काही दिवसांत भारत आणि न्यूझीलंड (India vs new zealand) या दोन्ही संघांमध्ये वनडे, कसोटी आणि टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. पण ही मालिका सुरू होण्याआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा तिन्ही फॉरमॅटमधील प्रमुख खेळाडू रचिन रवींद्र दुखापतग्रस्त झाला आहे. रचिन अनेकदा मैदानावर खेळताना दुखापत झाला आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडून जावं लागलं आहे. पण यावेळी तो मैदानावर खेळताना नव्हे, तर जाहिरातीच्या शूटदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रोमो शूट दरम्यान झेल घेत असताना त्याचा खांदा सरकला आहे. त्यामुळे तो काही दिवस मैदानापासून दूर राहणार आहे. (Rachin Ravindra Injury)
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, ही दुखापत १६ सप्टेंबरला झाली होती. ऑकलंड येथे स्काय स्पोर्ट्सच्या प्रोमोशनल शूटदरम्यान रचिनने डाईव्ह मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याचा उजवा खांदा सरकला आहे.दरम्यान तो भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत खेळणार की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.
रचिन रवींद्रची दुखापतीतून सावरण्याची ट्रीटमेंट सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुखापत इतकीही गंभीर नाही. पण तो मैदानावर केव्हा पुनरागमन करणार, हे त्याच्या रिहॅबवरून ठरवलं जाणार आहे. भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत रचिन रवींद्र हा महत्वाचा खेळाडू असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी मालिका ही २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत रचिन रवींद्र पूर्णपणे फिट होणं खूप गरजेचं असणार आहे.
न्यूझीलंडचे परफॉर्मन्स मॅनेजर माईक सँडल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “त्याला जबर दुखापत झाली आहे. आम्हाला रचिनसाठी खूप वाईट वाटतंय. आम्ही याच गोष्टीला प्राधान्य देतोय की, तो पूर्णपणे फिट झाला पाहिजे. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर फिट होऊन त्याने मैदानावर पुनरागमन करावं. या प्रोमोशनल शूटसाठीही अनुमती देण्यात आली होती. तसेच सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. पण ही दुर्घटना कशी झाली, हे समजलं नाही. भविष्यात अशा प्रकारच्या इव्हेंट शूट दरम्यान आम्ही काळजी घेऊ.”
