Pakistan Cricketer Fined By ICC: दुबईत महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत ७ सप्टेंबरला झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि हाँगकाँग हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केले होते. या सामन्यादरम्यान पाकिस्तानची खेळाडू गुल फिरोजा अंपायरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत वादग्रस्त इशाराही केला होता. त्यानंतर आयसीसीने गुल फिरोजावर कारवाई केली आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने देखील वादग्रस्त सेलिब्रेशन केलं होतं. त्यामुळे तिच्यावरही कारवाई करण्यात आली होती.

गुल फिरोजावर आयसीसीची कारवाई

तर झाले असे की, पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाचवे षटक सुरू असताना अंपायरने गुल फिरोजाला LBW बाद घोषित केलं. त्यावेळी तिने अंपायरच्या निर्णयाला विरोध दर्शवला आणि अंपायरला बॅट दाखवली. ती हे सांगण्याच्या प्रयत्न करत होती की, चेंडू पॅडला लागण्याआधी बॅटला लागला आहे. अंपायरने दिलेल्या निर्णयाचा विरोध करणं आणि वाद घालणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. आता आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे.

गुल फिरोजाने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.८ चे उल्लंघन केले आहे. हे अंपायरने दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शवण्याशीत संबधित आहे. त्यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई केली असून तिच्या मॅच फी वर १० टक्के दंड आकारला आहे. यासह १ डिमेरिट पॉईंटही दिला आहे. कारण ही तिची पहिली चूक नाही. गेल्या २४ महिन्यात तिने केलेही ही दुसरी चूक आहे. गुलने देखील आपली चूक मान्य केली आहे.

भारताकडून दारूण पराभव

शनिवारी झालेल्या स्पर्धेतील ९ व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. भारतीय संघाला पराभूत करण्याची स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला. मुख्य बाब म्हणजे, सलामीवीरांना सोडलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकडा देखील गाठता आला नव्हता. तर ४ फलंदाजांना खातंही उघडता आलं नव्हतं. भारतीय संघाहा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ५६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६८ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.