Nuwan Thushara Set To Miss IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना २८ मार्चला बंगळुरूतील एम जिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण या पहिल्याच सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज नुवान तुषारा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नवीन फिटनेस लागू केल्यानंतर ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास नकार दिला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी नवीन फिटनेस पॉलिसी लागू केली आहे. ज्या खेळाडूंना आयपीएल किंवा पीएसएलसारख्या स्पर्धा खेळायच्या असतील, अशा खेळाडूंना ही फिटनेस टेस्ट पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नुवान तुषारा आयपीएल २०२६ स्पर्धा खेळणार की नाही, हे देखील या टेस्टवर अवलंबून होतं.
फिटनेस टेस्टचा निकाल काय आला?
न्यूज वायरच्या वृत्तानुसार नुवान तुषारा फिटनेस टेस्टमध्ये आवश्यक गुणांची कमाई करू शकलेला नाही. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. नुवान तुषारा संघात नसणं हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला १.६ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे. याआधी झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीही त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले असतानाही त्याला संघात स्थान देण्याचा विचार केला गेला नव्हता. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आनंदाची बातमी अशी की, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड भारतात दाखल झाला आहे. तो सनरायझर्स हैदराबादविरूद्ध होणाऱ्या सामन्या खेळताना दिसून येऊ शकतो.
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ:
विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार),फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान
