Jacob Bethell Injury Update: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनरायझर्स हैदराबादकडून ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण नेट रनरेटच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुणतालिकेत अव्वल स्थान राखलं आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा क्वालिफायर १ चा सामना दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे थेट फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे.

क्वालिफायर १ च्या महत्वाच्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्फोटक फलंदाज जेकब बेथेल दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. सध्या तो इंग्लंडला परतला असल्याची माहिती, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीम मॅनेजमेंटकडून देण्यात आली आहे. आयपीएल झाल्यानंतर इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. या मालिकेत तो खेळणार की नाही, हे तो पूर्णपणे फिट होणार की नाही यावर अवलंबून असणार आहे.

फिल सॉल्ट दुखापतग्रस्त झाल्यानंतर जेकब बेथेलला सातत्याने डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जात होती. पण तो स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही . या हंगामातील एकाही सामन्यात तो हवी तशी सुरुवात करुन देऊ शकलेला नाही. याआधी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाविरूद्ध खेळताना त्याने दमदार शतकी खेळी केली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे फायनलमध्ये जाण्याची संधी

गेल्या हंगामातील चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे या हंगामातही फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या हंगामातील साखळी फेरीतील १४ पैकी ९ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयाची नोंद केली आहे. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. गुजरात टायटन्सने देखील १८ गुणांची कमाई केली आहे. पण नेट रनरेट चांगला असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.