Royal Challengers Bengaluru: आयपीएल २०२६ स्पर्धेची सुरुवात आजपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाला गेल्या हंगामात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण हा संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नव्हता. तर दुसरीकडे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गेल्या हंगामात दमदार कामगिरी केली होती. १८ वर्षांनंतर या संघाने पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. दरम्यान या हंगामातील पहिल्या सामन्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गेल्या हंगामातील अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता. या विजयात संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने मोलाची भूमिका बजावली होती. हे हंगाम सुरू होण्याआधी तो संघासोबत तर जोडला गेला आहे. पण तो सनरायझर्स हैदराबादविरूद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी जोश हेझलवूडबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना, त्याच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे.
अँडी फ्लॉवर हेझलवूडबद्दल बोलताना म्हणाले, “हेझलवूड काल संघासोबत जोडला गेला आहे. तो फिट दिसतोय. पण तो उद्या होणाऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार नाही, कारण तो प्रवास करून आला आहे. आम्ही त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत. आशा करतो, तो लवकरच मैदानात प्रवेश करेल.” आगामी हंगाम सुरू होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तो भारतात येऊ शकलेला नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना फिटनेस टेस्ट पास करणं बंधनकारक केलं होतं. पण तो फिटनेस टेस्ट पास करू शकला नव्हता. त्यामुळे तो पहिल्या टप्प्यातून बाहेर होऊ शकतो.
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ:
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान
