David Payne Ruled Out Of IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत या संघाची जबाबदारी युवा फलंदाज इशान किशनकडे सोपवण्यात आली. आता हैदराबाद संघाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पॅट कमिन्स लवकरच संघासोबत जोडला जाणार आहे. एकीकडे आनंदाची बातमी मिळाली असताना हैदराबादचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. संघातील स्टार खेळाडू डेव्हिड पेन आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सनरायझर्स हैदराबादने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी डेव्हिड पेन दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२६ स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर होत असल्याची माहिती दिली आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने २ गडी बाद केले होते. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. सध्या तरी डेव्हिड पेनची जागा कोण घेणार, याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही.

याच हंगामात त्याला आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. याआधी बिग बॅश लीगमध्ये त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत गोलंदाजी करताना त्याने २२ सामन्यांमध्ये ३३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली होती. यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याने दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंडकडून खेळताना त्याने १७ सामन्यांमध्ये २७ गडी बाद केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११५ सामन्यांमध्ये त्याने ३२८ गडी बाद केले आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ७० सामन्यांमध्ये त्याने ११५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे.

दुष्काळात तेरावा महिना..

डेव्हिड पेन स्पर्धेच्या मध्यात दुखापतीमुळे बाहेर होणं हा हैदराबादसाठी मोठा धक्का आहे. कारण आताच पॅट कमिन्स संघासोबत जोडला जाणार आहे. तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. येत्या २५ एप्रिलला तो पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. एकीकडे कमिन्स परतला आहे. तर दुसरीकडे डेव्हिड पेन संघाबाहेर झाला आहे.