Sunrisers Hyderabad, IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेची सुरूवात येत्या २८ मार्चपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याआधी सनरायझर्स हैदराबाद संघाने मोठी घोषणा केली आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी स्फोटक फलंदाज इशान किशनची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान स्पर्धा सुरू होण्याआधी अवघे काही दिवस शिल्लक असताना, सनरायझर्स हैदराबाद संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का

आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होण्याआधी सनरायझर्स हैदराबाद संघाचं टेन्शन वाढलं आहे. संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जॅक एडवर्ड्स हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शेफिल्ड शिल्ड स्पर्धा खेळत असताना, तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आलं होतं. मेडिकल टीमने तपासणी केल्यानंतर त्याला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो आगामी आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही. हा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे.

जॅक एडवर्ड्सला आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. पण त्याची फलंदाजी आणि गोलंदाजीतील क्षमता पाहून सनरायझर्स हैदराबादने त्याला ३ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. त्याला आतापर्यंत ७७ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ८५३ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ५२ गडी बाद केले आहेत.

जॅक एडवर्ड्स हा सनरायझर्स हैदराबाद संघातून बाहेर होणारा पहिलाच खेळाडू नाही. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स देखील अजूनपर्यंत पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे तो स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी अभिषेक शर्माकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.