Sai Sudarshan Injury Update: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू श्रीलंकेत दाखल झाले आहेत. पण ही मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आकिब नबीला संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान मालिका सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्टार फलंदाज साई सुदर्शन अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर होऊ शकतो.
एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, साई सुदर्शन सध्या बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये असून आपल्या पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. सध्या तो रिहॅब करत असून, फलंदाजीचा सराव देखील करत आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.या मालिकेला सुरुवात होण्याआधी तो पूर्णपणे फिट होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या ३-४ दिवसात त्याच्या फिटनेसबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
याआधी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय अ संघाचं प्रतिनिधित्व करत असताना, त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अजूनही पूर्णपणे सावरु शकलेला नाही. त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी संघात तर स्थान देण्यात आलं आहे. पण तो खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. जर साई सुदर्शन पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. तर त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी दिली जाऊ शकते. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हा सामना कोलंबोत खेळवला जाणार आहे.साई सुदर्शन पूर्णपणे फिट होऊन दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करु शकतो.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान गॉलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी ७ ऑगस्टपासून ते ९ ऑगस्टपर्यंत ३ दिवसीय सराव सामना खेळवला जाणार आहे. याआधी हा सामना ४ दिवसांचा होणार होता. पण बदल केल्यानंतर, हा सामना ३ दिवस खेळवला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्टदरम्यान खेळवला जाणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग असणार आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थानी असलेला भारतीय संघ आणि सहाव्या स्थानी असलेला श्रीलंकेचा संघ ही मालिका जिंकून गुणतालिकेत वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
