Team India Kit Size Issue Ahead Of Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट या इव्हेंटला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील महिलांचे क्रिकेट सामने सुरू झाले आहेत. तर भारतीय पुरुषांचा संघ २० सप्टेंबरला या स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. पण जपानला रवाना होण्याआधीच अधिकृत किटवरून गोंधळ झाला आहे. काही खेळाडूंच्या किटवरून गोंधळ झाल्याने बीसीसीआय आणि JSW इंस्पायर यांच्यात चर्चा सुरू आहे. काही खेळाडूंना अद्यापही योग्य किट मिळालेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंच्या अधिकृत किटच्या साइजसंदर्भात अडचणी येत आहेत. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने JSW इन्सपायरोबत भागीदारी केली आहे. खेळाडूंना ज्या समस्या येत आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय आणि JSW इन्सपायर यांच्यात चर्चा सुरू आहे. पीटीआयच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, बहुतांश खेळाडूंच्या समस्येवर तोडगा काढण्यात आला असून, त्यांना योग्य साइजची किट मिळाली आहे.
भारतीय संघ या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी २० सप्टेंबरला दिल्ली येथून रवाना होणार आहे. या स्पर्धेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. संघाने जायची तयारी केली आहे, पण काही खेळाडूंना अजूनही आपली अधिकृत किट मिळालेली नाही. केवळ क्रिकेट नव्हे, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी असलेल्या इतर खेळातील काही खेळाडूंना देखील अद्यापही जर्सी मिळालेली नाही. भारताचा गोळाफेक क्रीडा प्रकारातील खेळाडू तजिंदरपाल सिंग ओपनिंग सेरेमनीला भारतीय दलाचं नेतृत्व करणार होता. पण त्यालाही अधिकृत किट मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी कबड्डीपट्टू पवन सेहरावत ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाचं नेतृत्व करणार आहे.
भारतीय संघ २ जर्सी घालून उतरणार मैदानात
भारतीय संघ जपानमध्ये २ जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. जपानला गेल्यानंतर भारतीय संघ २२ सप्टेंबरला जपानविरुद्ध एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात भारतीय संघ आपली अधिकृत टी-२० जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने दिलेल्या जर्सीत खेळताना दिसून येणार आहे.
