ICC T20I Ranking After England vs Srilanka T20I Series: इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडने दमदार विजयाची नोंद केली. मालिकेतील तिसरा सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ८ गडी राखून एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयासह मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. या विजयानंतर इंग्लंडचा संघ आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.

भारतीय संघाने ५५ दिवसांनंतर पुन्हा एकदा नंबर १ स्थानी कब्जा केला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १२४ धावा केल्या होत्या. हे आव्हान इंग्लंडने अवघ्या ९.४ षटकांत पूर्ण केलं. इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून आणि ६२ चेंडू शिल्लक ठेवून आपल्या नावावर केला. यासह इंग्लंडने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान धावांचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. याआधी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत इंग्लंडने ४-० ने विजय मिळवून आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कब्जा केला होता. त्यानंतर भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेदरम्यान भारतीय संघाने २-० ने विजय मिळवून पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं होतं. आता इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत करून पुन्हा एकदा नंबर १ स्थान मिळवलं आहे.

बटलरची तुफान फटकेबाजी

या सामन्यातही जोस बटलरची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. बटलरने हॅरी ब्रुकसोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंमध्ये ८५ धावांची दमदार भागीदारी केली. या दोन्ही फलदाजांनी पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना संघाची धावसंख्या ८२ धावांवर पोहोचवली. त्यानंतर हॅरी ब्रुक ३३ धावा करून माघारी परतला.

ब्रुक माघारी परतला. पण बटलरने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ६२ धावांची खेळी केली. ही खेळी त्याने १९३.७५ च्या स्ट्राईक रेटने केली. या खेळीसह त्याने बाबर आझमचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. जोस बटलरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३२ वेळा ५० हून अधिक धावांची खेळी केली आहे. यासह त्याने मोहम्मद रिझवानला मागे टाकलं आहे. रिझवानने टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१ वेळेस ५० हून अधिक धावांची खेळी केली आहे. यासह इंग्लंडने हा सामना एकतर्फी आपल्या नावावर केला.