Hardik Pandya Injury: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात १३ सप्टेंबरपासून होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला हार्दिक पंड्या अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून बाहेर होऊ शकतो. सध्या तो बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. यादरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचं पुनरागमन आणखी लांबणीवर गेलं आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून हार्दिक पंड्या पुनरागमन करणार, अशी चर्चा रंगली होती. पण मालिकेला सुरुवात होण्याआधीच तो दुखापतग्रस्त झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर होऊ शकतो. हार्दिक सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्नात होता. पण आता त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला पुनरागमन करण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते.
एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला माहितीत सांगितले की, “हार्दिक पंड्या कुठल्याही अडथळ्याशिवाय रिकव्हर होत होता. पण पायाच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तो लवकरच फिट होऊन पुन्हा गोलंदाजी करायला सुरुवात करेल, पण अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी तो पूर्णपणे फिट होणं कठीण आहे. फलंदाजी करताना किंवा चालताना कुठलाही अडथळा येणार नाही, पण तो जोपर्यंत फिट होणार नाही, तोपर्यंत त्याला खेळण्याची अनुमती दिली जाणार नाही.”
हार्दिकचं पुनरागमन केव्हा होणार?
हार्दिक पंड्या आयपीएल २०२६ स्पर्धेतही मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या हंगामात सुरुवातीचे सामने झाल्यानंतर शेवटच्या काही सामन्यांदरम्यान हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. २४ मे २०२६ ला तो मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. तर ८ मार्च २०२६ ला तो भारतीय संघाासाठी शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. पण मालिका सुरू होण्याआधीच तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धची मालिकाही खेळू शकला नव्हता.
