Ishan Kishan Injury: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील भारतीय संघाचा दुसरा सामना नामिबियाविरूद्ध खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला अमेरिकेविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २९ धावांनी विजय मिळवला. पण विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला बराच संघर्ष करावा लागला होता. जसप्रीत बुमराह आजारी असल्याने पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तो दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करणार आहे. तर अभिषेक शर्मा आजारी असल्याने दुसरा सामना खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सराव करत असताना इशान किशन दुखापतग्रस्त झाला आहे.

भारतीय संघात दुखापतीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा नुकताच दुखापतीतून सावरून संघात परतला आहे. त्यामुळे नामिबियाविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघेही पुनरागमन करू शकतात. पण सलामीवीर फलंदाज इशान किशन नामिबियाविरूद्ध होणाऱ्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

इशान किशन नामिबियाविरूद्धच्या सामन्याला मुकणार?

भारतीय संघ सध्या दिल्लीत आहे. भारत आणि नामिबिया यांच्यात होणारा सामना १२ फेब्रुवारीला दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवसाआधी भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. दरम्यान सराव करत असताना जसप्रीत बुमराहने टाकलेल्या वेगवान यॉर्करमुळे इशान किशनच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. काही वेळ त्याला वेदना झाल्या, त्यानंतर त्याने पुन्हा फलंदाजी करायला सुरूवात केली. पण फलंदाजी करत असताना त्याला वेदना होत होत्या. त्यामुळे इशान किशन नामिबियाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इशान किशन जर हा सामना खेळू शकला नाही, तर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असू शकतो. कारण अभिषेक शर्माला आजारी असल्यामळे रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यामुळे इशान आणि संजू सॅमसन डावाची सुरूवात करणार अशी चर्चा सुरू आहे. पण जर, अभिषेकसह इशान किशनही स्पर्धेतून बाहेर पडला, तर संजू सॅमसनसोबत डावाची सुरूवात कोण करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.