jasprit Bumrah Ruled Out: टी-२० क्रिकेटचा थरार संपल्यानंतर आता भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्याआधी भारतीय संघ सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माध्यमातील वृत्तानुसार जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्यावरुन बाहेर होऊ शकतो.
जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. तसेच हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. या मालिकेआधी बुमराह संघाबाहेर होणं, हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा धक्का आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने कुठलीही जोखीम घेण्यास नकार दिला आहे. पण बीसीसीआयकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता बुमराह बाहेर झाल्यानंतर, त्याच्या जागी कोणाला संधी दिली जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. गेल्या महिन्यात त्याने इंजेक्शन घेतलं होतं. पण तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान तर दिलं गेलं. पण तो खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून होतं. आता मालिकेआधीच दुखापतीमुळे तो बाहेर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. ही मालिका जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन
