Rinku Singh: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. चारही सामने जिंकून भारतीय संघाने सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. पण सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. हा सामना देखील भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. पण या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. रिंकू सिंग आपल्या घरी परतला आहे.
भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पुढील सामना झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. हा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी रिंकू सिंग आपल्या घरी परतला आहे. या महत्वाच्या सामन्याआधी मंगळवारी सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. या सराव सत्रात रिंकू सिंग सोडून इतर सर्व भारतीय खेळाडू होते.
नेमकं कारण काय?
माध्यमातील वृत्तानुसार, रिंकू सिंगच्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे. रिंकू सिंग उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये राहतो. भारतीय संघाचा पुढील सामना २ दिवसांनंतर चेन्नईत होणार आहे. रिंकू घरी तर परतला आहे. पण तो पुढील सामन्याआधी पुन्हा एकदा भारतीय संघासोबत जोडला जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रिंकू सिंगबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मंगळवारी झालेल्या सराव सत्रात संजू सॅमसन नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून आला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात संजू सॅमसनचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिषेक शर्माला एका सामन्यात विश्रांती दिली गेली होती. त्यावेळी अभिषेकच्या जागी संजू सॅमसनला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली होती. पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नव्हता. अभिषेक शर्मा परतल्यानंतर संजूला पुन्हा एकदा विश्रांती दिली गेली होती. आता तिलक वर्माच्या जागी संजूला संधी मिळणार असल्याची चर्चा रंगलेली असताना, रिंकू घरी परतला आहे. त्यामुळे जर रिंकू माघारी परतला नाही, तर त्याच्या जागी संजूला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
