Washington Sundar Injury Update: भारतीय संघात दुखापतीचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही महिन्यांत बरेचशे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. येत्या १५ ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले आहेत. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार फलंदाज साई सुदर्शन हे दोघेही दुखापतीमुळे भारत – श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. आता भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १५ ते १९ ऑगस्टदरम्यान गॉलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर देखील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर होऊ शकतो.

इंग्लंड दौऱ्यावर असताना वॉशिंग्टन सुंदरच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. तो अजूनही या दुखापतीतून सावरु शकलेला नाही. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान तर दिलं गेलं होतं. पण तो खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून होतं. तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही, हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. आता टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तो मालिकेतील दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर होऊ शकतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीत सांगितले की, “सध्या तरी वॉशिंग्टन सुंदर श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. टीम मॅनेजमेंटला त्यानुसार प्लॅनिंग करावी, असं सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याला कसोटी सामन्यात खेळवण्याबाबत खबरदारी घेत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर खेळाडूंना पुन्हा एकदा दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वॉशिंग्टनला दुसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं होतं. पण तो पूर्णपणे फिट होण्याची शक्यता खूप कमी होती. इंग्लंडमध्ये असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो जास्त सामने खेळू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या वर्कलोडवर काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे.”

बुमराह बाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी आकिब नबीला संधी दिली गेली होती. तर साई सुदर्शन बाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी सर्फराज खानचा संघात समावेश करण्यात आला होता. पण वॉशिंग्टन सुंदर संघाबाहेर झाल्यास, त्याच्या जागी कुठल्याही खेळाडूला संधी दिली जाणार नाही. कारण बीसीसीआयने आधीच १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. जर वॉशिंग्टन सुंदर संघासोबत जोडला गेला, तर तो १६ वा सदस्य असेल.