Washington Sundar Injury Replacement: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकात दमदार विजय मिळवला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. पण या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं होतं. दरम्यान बीसीसीआयकडून वॉशिंग्टन सुंदर मालिकेतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यासह त्याच्या बदली खेळाडूची देखील घोषणा करण्यात आली आहे.

पहिल्या वनडे सामन्यादरम्यान गोलंदाजी करत असताना वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. त्यामुळे ५ षटक टाकल्यानंतर तो मैदान सोडून बाहेर गेला. सामन्यानंतर त्याचा स्कॅन करण्यात आला. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर करण्यात आलं आहे. त्याच्या जागी दिल्लीचा स्टार खेळाडू आयुष बदोनीला स्थान देण्यात आलं आहे.

बीसीसीआयने प्रेस रिलीज शेअर करून वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. पहिल्या वनडे सामन्यादरम्यान गोलंदाजी करत असताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील दोन्ही सामन्यांना मुकावं लागणार आहे.

वॉशिंग्टन सुंदरमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढणार?

या मालिकेतून वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर होणं ही भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बाब आहे. कारण येत्या काही दिवसात आयसीसी टी – २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अवघे काही दिवस शिल्लक असताना वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त होणं हे भारतीय संघासाठी चिंता वाढवणारं आहे. आता तो या स्पर्धेपूर्वी फिट होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या उर्वरीत २ सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आयुष बदोनी