India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. तर दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने विजय मिळवून दमदार पुनरागमन केलं. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर झाला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने दमदार अर्धशतकी खेळून भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर तो दुसऱ्या डावात मैदानात येऊ शकला नव्हता. आता दुखापतीमुळे तो तिसऱ्या वनडे सामन्यातही खेळू शकणार नाही. त्याच्या जागी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

कार्डिफच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्या डावात तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. पण या सामन्यात तो ५ चेंडूत अवघ्या २ धावा करू शकला होता. ज्यावेळी तो मैदान सोडून जात होता, त्यावेळी त्याला चालायला त्रास होत होता. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना

सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. तर दुसऱ्या वनडेत इंग्लंडने पलटवार केला आणि सामना खिशात घातला. आता तिसरा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, अशी चर्चा रंगली होती. पण बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, रोहित आणि बीसीसीआयमध्ये अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे हा रोहितचा शेवटचा वनडे सामना नसेल, हे तर स्पष्ट झालं आहे.