Aaron Jones Suspended: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार भारत आणि श्रीलंकेत रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारतीय संघाचा सामना अमेरिकेविरूद्ध होणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच अमेरिका संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू आरोन जॉन्सवर फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदीची कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. २०२३-२४ मध्ये बार्बाडोसमध्ये BIM10 या लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या लीग स्पर्धेरदरम्यान आरोनने भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केले होते, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसीने) अमेरिकेचा खेळाडू आरोन जोन्सवर क्रिकेट वेस्ट इंडिज आणि आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप २०२३-२४ मध्ये झालेल्या BIM10 या स्पर्धेशी संबधित आहेत. यासह इतर २ आरोप हे आंतरराष्ट्रीय सामन्यांशी संबधित आहेत, जे आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांतर्गत येतात. आयसीसीने घेतलेल्या निर्णयामुळे, त्याला तत्काळ प्रभावाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. २८ जानेवारी २०२६ पासून पुढे १४ दिवसात त्याला या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

तसेच आयसीसीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, “हे आरोप तपासाचा एक भाग आहेत. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान येणाऱ्या काही काळात आणखी काही खेळाडू आणि सहभागी व्यक्तींविरूद्ध देखील अतिरिक्त आरोप लावले जाण्याची शक्तव्या वर्तवली जात आहे.”

आरोन जोन्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधित्व करतो. त्याला अमेरिकेसाठी १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यासह तो कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा आणि मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतही खेळताना दिसून आला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचे आयोजन संयुक्तरित्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेतही त्याने अमेरिकेचं प्रतिनिधित्व केलं होतं. जोन्सला २०१९ मध्ये अमेरिकेकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या संघाकडून खेळताना ५२ वनडे सामन्यांमध्ये त्याने १६६४ धावा केल्या आहेत. तर ७८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ७७० धावा केल्या आहेत.