ICC ODI Ranking Update: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही मालिका झाल्यानंतर आयसीसीकडून वनडे रँकिंगची घोषणा करण्यात आली आहे. या रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेलने मोठी झेप घेतली आहे. मालिकेतील ३ पैकी २ सामन्यांमध्ये शतक झळकावून मिचेलने ३५२ धावा कुटल्या. या दमदार कामगिरीचं फळ म्हणून तो ८४५ रेटिंगसह वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी घसरला आहे.

ही वनडे रँकिंग जाहीर होण्यापूर्वी विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी होता. पण डॅरिल मिचेलने विराटला मागे टाकलं आहे. अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज इब्राहिम जादरान या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर रोहित शर्मा या यादीत चौथ्या स्थानी आहे. रोहित शर्माची रेटिंग ७५७ इतकी असून तो यादीत तिसऱ्या स्थानी होता. तर भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल या यादीत पाचव्या स्थानी आहे. भारतीय संघातील टॉप ३ फलंदाज हे आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टॉप ५ फलंदाजांमध्ये आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम या यादीत सहाव्या स्थानी आहे. तर आयर्लंडचा स्टार फलंदाज हॅरी टेक्टर या यादीत सातव्या स्थानी आहे. वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज शे होप या यादीत आठव्या स्थानी आहे. तर चरिथ असलंका नवव्या स्थानी आणि केएल राहुल दहाव्या स्थानी आहे. वनडे क्रमवारीतील टॉप १० फलंदाजांमध्ये ४ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. विराट कोहली अवघ्या ५० पॉइंट्सने मागे आहे. तो लवकरच पुन्हा एकदा नंबर १ स्थानी कब्जा करू शकतो.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेदरम्यान डॅरिल मिचेलची बॅट चांगलीच तळपली. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. याच कामगिरीच्या बळावर त्याने वनडे क्रिकेटमध्ये ८४५ रेटिंगसह अव्वल स्थान मिळवलं आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. वनडे कारकिर्दीत त्याने ५९ सामन्यांमध्ये २६९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५८.४७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.