KL Rahul Dropped Easy Catch: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान गॉलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे . त्याआधी दोन्ही संघ कोलंबोत ३ दिवसीय सराव सामन्यासाठी मैदानात उतरले आहेत. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. त्यामुळे भारतीय गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करताना दिसून आले. पण जेव्हा विकेट घेण्याची संधी मिळाली, त्यावेळी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या केएल राहुलने सोपा झेल सोडला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोलंबोत सुरु असलेल्या सामन्यात शुबमन गिल दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघातील गोलंदाज सुरुवातीला विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून आले. त्यावेळी २६ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू कुलदीपने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या चेंडूवर फलंदाज रविंदू रसन्थाने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. केएल राहुलकडे सोपा झेल घेण्याची संधी होती. पण एका हाताने झेल घेण्याच्या प्रयत्नात हा सोपा झेल सुटला.
भारतीय संघात एकापेक्षा एक उत्तम क्षेत्रपरक्षक आहेत. पण गेल्या काही वर्षांत भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालावला आहे. आयर्लंड दौऱ्यावरही भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल सोडले. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं आहे. सुरुवातीला केएल राहुलने सोपा झेल सोडला. त्यानंतर लंच ब्रेकनंतर देवदत्त पडिक्कलनेही जडेजाच्या गोलंदाजीवर झेल सोडला. आधी भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी टी. दिलीप यांच्याकडे होती. पण काही दिवसांपूर्वीच त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी सुबदीप घोष यांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल, तर फलंदाजी आणि गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही सुधार करावा लागेल.
सामन्यातील पहिल्या दिवशी काय घडलं?
या सामन्यातील पहिल्या दिवशी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेकडून मदुश्का आणि रसन्थाने मिळून पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यादरम्यान मदुश्काने ६६ आणि रसन्थाने ७१ धावांची खेळी केली. तर सूर्यबंद्राने ३५, पवन रथनायकेने ३९, सोनल दिनूशाने ५२ धावांची खेळी केली. श्रीलंकेने पहिल्या दिवसाअखेर ८ गडी बाद ३६३ धावा केल्या आहेत.
