India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने पुनरागमन केलं आणि दमदार विजय मिळवला. कार्डिफच्या मैदानावर मिळवलेल्या विजयासह इंग्लंडने ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मालिकेतील तिसरा सामना १९ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. या निर्णायक सामन्याआधी इंग्लंडने आपल्या संघात मोठा बदल केला आहे.

या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने लियाम डॉसन आणि टॉम बँटनला संघात स्थान दिलं होतं. डॉसनला मालिकेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी करुन ६८ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने जो रुटसोबत मिळून १२१ धावांची भागीदारी केली होती. पण या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती दिली गेली होती. तर दुसरीकडे टॉम बँटनला मालिकेतील दोन्ही सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता दोन्ही खेळाडूंना इंग्लंडच्या मुख्य संघातून बाहेर करण्यात आलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना १९ जुलैला खेळवला जाणार आहे. त्याआधी १८ जुलैला टी-२० ब्लास्ट स्पर्धेतील सेमी फायनलचे सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलचा सामना नॉर्थम्प्टनशायर आणि स्टीलबॅक्स या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये हॅम्पशायर हॉक्स आणि नॉट्स आऊटलॉज या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हे दोन्ही खेळाडू टी-२० ब्लास्ट स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत.

भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होणार?

या निर्णायक सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्येही बदल पाहायला मिळू शकतो. मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कोणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी सुंदरच्या जागी कुलदीप यादवचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.