हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. ५ वेळचा चॅम्पियन संघ यावेळी एक एक विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा दुखापतीमुळे गेले ३ सामने खेळू शकलेला नाही. याचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर दिसून आलेला आहे. गेल्या ३ पैकी दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ ज्या संघांना घरात घुसून पराभूत करायचा, ते संघ आता मुंबईला आपल्या घरच्या मैदानावर पराभूत करत आहे. त्यामुळे रोहित शर्मा पुनरागमन केव्हा करणार? अशी चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान रोहित शर्मा केव्हा पुनरागमन करणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. क्रिकबझच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. तो अजूनही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. पण मुंबई – हैदराबाद सामन्याआधी त्याला मोठा ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे या सामन्याआधी तो फिट होऊ शकतो. मुंबई आणि हैदराबाद यांच्यात होणारा सामना २९ एप्रिलला खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर रोहितला पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या महत्वाच्या सामन्यांमधून बाहेर राहावं लागलं आहे. आता पुढील सामने मुंबई इंडियन्ससाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महत्वाचे असणार आहे. मुंबईने एकही सामना गमवला, तर प्लेऑफचं स्वप्न धुळीस मिळेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने आपल्या प्रशिक्षकांसोबत मिळून फिटनेसवर काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तो लवकरच फिट होऊन मैदानात पुनरागमन करू शकतो. रोहितने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. त्याने ऑरेंज कॅपवर देखील कब्जा केला होता. पण त्यानंतर त्याला बाहेर व्हावं लागलं. सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये त्याने १३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक अर्धशतक झळकावलं होतं.
