भारतीय बॅडिमटनमधील सर्वात मोठे यश! ; माजी बॅडिमटनपटू आणि प्रशिक्षक उदय पवारांचे मत  

‘‘स्पर्धेसाठी बँकॉकला जाण्यापूर्वी सात्त्विक आणि चिराग यांनी मॅथियस बो यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे दहा दिवस सराव केला

संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : पुरुष संघाने थॉमस चषकाच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिले सुवर्णपदक जिंकणे हे भारतीय बॅडिमटनमधील सर्वात मोठे यश असल्याचे मत माजी बॅडिमटनपटू आणि प्रशिक्षक उदय पवार यांनी व्यक्त केले.

भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंडोनेशियाला ३-० अशी धूळ चारली. त्यापूर्वी त्यांनी मलेशिया आणि डेन्मार्कवरही विजयांची नोंद केली. ‘‘यंदा थॉमस चषकात सहभागी झालेल्या भारतीय संघात दर्जेदार खेळाडूंचा समावेश होता. त्यांना योग्य वेळी लय सापडणे हे भारतासाठी महत्त्वाचे ठरले. ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण बॅडिमटन स्पर्धा मानली जाते. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळे पुरुष संघाने ही स्पर्धा जिंकणे हे भारतीय बॅडिमटनमधील सर्वात मोठे यश आहे,’’ असे पवार म्हणाले. भारताच्या यशात सर्वच खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे असले, तरी सात्त्विकसाइराज रंक्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीची कामगिरी लक्षवेधी ठरली. ‘‘स्पर्धेसाठी बँकॉकला जाण्यापूर्वी सात्त्विक आणि चिराग यांनी मॅथियस बो यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे दहा दिवस सराव केला. या सराव शिबिराचा त्यांना फायदा झाला. या दोन्ही खेळाडूंनी जगातील आघाडीच्या खेळाडूंना नमवले. त्यांची भारतीय संघाच्या यशातील भूमिका महत्त्वाची होती. मात्र, एकेरीतील खेळाडूंचेही कौतुक झाले पाहिले. लक्ष्य, श्रीकांत आणि प्रणॉय यांना चांगला सूर गवसला होता. लक्ष्यला बाद फेरीत काही सामने गमवावे लागले; पण निर्णायक लढतीत त्याने संघर्षपूर्ण विजय मिळवला,’’ असे पवार यांनी सांगितले.

मुंबईकर चिराग शेट्टीने पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच बॅडिमटनचे धडे गिरवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Biggest success in indian badminton coach uday pawar s opinion zws

Next Story
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा : भारताचा ऐतिहासिक सुवर्णाध्याय!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी