Blair Tickner Injured: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळाडूला जबर दुखापत झाली आहे. वेलिंग्टनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केली आणि यादरम्यान दुखापतीमुळे त्याला रूग्णालयात न्यावं लागलं. न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात २०५ धावांवर सर्वबाद केलं. या पहिल्याच डावात ४ विकेट्स घेणाऱ्या ब्लेयर टिकनरला दुखापत झाली.

उजव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज वेस्ट इंडिजविरुद्ध चार विकेट्स घेत भेदक गोलंदाजी करत होता, पण क्षेत्ररक्षण करताना त्याला गंभीर दुखापत झाली; त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. फाइन लेगवर क्षेत्ररक्षण करताना, टिकनरने चेंडू अडवण्यासाठी उडी मारली आणि त्याच वेळी त्याचा खांदा जमिनीवर आदळला आणि खांदा निखळला.

दुखापत झाल्यानंतर ब्लेअर टिकनर मैदानावरून उठला नाही. त्याची हालचाल होत नसल्याचे पाहून किवी फिजिओ ताबडतोब मैदानावर आले आणि त्यानंतर त्याचा खांदा निखळल्याचं समोर आलं. त्यानंतर मैदानावर स्ट्रेचर आणण्यात आलं आणि त्याला थेट रुग्णालयात नेण्यात आलं. ताज्या वृत्तांनुसार, तो अजूनही हॉस्पिटमध्ये दाखल आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली या जोडगोळीला बाद करणारा ब्लेयर टिकनर दोन वर्षांनी न्यूझीलंडच्या कसोटी संघात परतला होता आणि त्याने भेदक गोलंदाजी करत ४ विकेट्सही घेतल्या होत्या. या दुखापतीमुळे तो किमान ३-४ महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. शिवाय, टिकनरच्या पत्नीलाही ब्लड कॅन्सरचं निदान झालं आहे. गेल्या वर्षी, तो डर्बिशायरकडून काउंटी क्रिकेट खेळत असताना, त्याच्या पत्नीला ब्लड कॅन्सरचं निदान झालं. त्यावेळेस त्याची पत्नी गरोदर होती. टिकनरच्या पत्नीवर उपचार सुरू असतानाच त्याला देखील दुखापत झाली आहे.

वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या दिवशी, वेस्ट इंडिजचा पहिला डाव फक्त २०५ धावांवर आटोपा. शे होपने सर्वाधिक ४८ धावा केल्या. जॉन कॅम्पबेलनेही ४४ धावा केल्या. पण गोलंदाजीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कहर केला. ब्लेअर टिकनरने चार विकेट घेतल्या, तर मायकेल रेने तीन विकेट घेतल्या. दिवसाअखेर न्यूझीलंडने बिनबाद २४ धावा केल्या होत्या.