Blair Tickner Catch And Naagin Dance Celebration Video: आयपीएल २०२६ सुरू असताना न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने २६ धावांनी पराभव करत चांगली सुरूवात केली आहे. पण या सामन्यादरम्यानचा न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ब्लेअर टिकनर राशीद हुसैनला बाद केल्यानंतर नागिण डान्स सेलिब्रेशन करत आहे.
ब्लेअर टिकनरने आपल्या १० षटकांत ४० धावा देऊन ४ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. विशेष म्हणजे, त्याने स्वतःच्या गोलंदाजीवर रिशाद हुसेनला बाद करण्यासाठी एक अप्रतिम झेलही घेतला, ज्यानंतर तो ‘नागिन सेलिब्रेशन’ करताना कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना बांगलादेशच्या डावाच्या ४६ व्या षटकात घडली.
ब्लेअर टिकनर ४६वं षटक टाकत होता. ब्लेअर टिकनर आपलं नववं षटक टाकण्यासाठी आला आणि पाचव्या चेंडूवर त्याने एका स्लोअर चेंडूवर रिशाद हुसेनला आपल्या जाळ्यात अडकवलं. बांगलादेशी फलंदाजाने गोलंदाजाच्या चेंडूवर सरळ समोरच्या दिशेने फटका मारून एक मोठी चूक केली. ब्लेअर टिकनरने त्याचा फटका पाहताच लगेच चेंडूच्या दिशेने आला आणि हवेत झेप घेत उत्कृ्ष्ट झेल टिपला. टिकनरचा झेल आश्चर्यचकित करणारा होता. विशेष गोष्ट म्हणजे तो इथेच थांबला नाही, त्यानंतर ‘नागिन सेलिब्रेशन’ करून रिशादच्या विकेटचं त्याने भन्नाट सेलिब्रेशन केलं.
बांगलादेशी खेळाडू अनेकदा ‘नागिन डान्स सेलिब्रेशन’ करून आपल्या प्रतिस्पर्ध्यांची चेष्टा करतात, पण यावेळी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने स्वतः हे सेलिब्रेशन करत बांगलादेशी खेळाडूंची थट्टा केली आहे. ब्लेअर टिकनरच्या सेलिब्रेशनचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ५० षटकांत ८ गडी गमावून २४७ धावांचा डोंगर उभारला. हेन्री निकोल्स (८३ चेंडूंत ६८ धावा) आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट (५८ चेंडूंत ५९ धावा) यांनी अर्धशतकं झळकावली.
प्रत्युत्तरात, बांगलादेशच्या दोन खेळाडूंनी, सॅम हसन (७६ चेंडूंत ५७ धावा) आणि तौहीद हृदोय (६० चेंडूंत ५५ धावा) यांनी अर्धशतकं झळकावली. असं असूनही, त्यांचा संघ केवळ ४८.३ षटकंच टिकला आणि २२१ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे, न्यूझीलंडने हा सामना २६ धावांनी जिंकला. यासह, किवी संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशवर १-० अशी आघाडी घेतली आहे.
