Blessing Muzarbani Banned for 2 Years: आयपीएल २०२६ मध्ये आज १४ एप्रिलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी केकेआरचा गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. ब्लेसिंग मुझरबानीला चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध आजचा सामना खळण्याची संधी मिळालेली नाही.
पीएसएल सोडून आयपीएलमध्ये सामील झालेल्या खेळाडूंना शिक्षा देण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. अशाच एका खेळाडूवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बंदी घातली आहे. हा खेळाडू झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी आहे. इस्लामाबाद युनायटेडने मुझारबानीला विकत घेतलं होतं आणि तो पीएसएलमध्ये खेळणार हे निश्चित वाटत होतं. पण लीग सुरू होण्यापूर्वीच, आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानच्या जागी मुझारबानीला करारबद्ध केलं. यासह, त्याने पीएसएल सोडून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) या निर्णयामुळे नाराज झाले होते आणि त्यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजावर कारवाई करण्याबद्दल चर्चा केली होती. मंगळवारी, पीसीबीने सांगितलं की त्यांनी मुझारबानीवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. एका निवेदनात पीसीबीने म्हटले आहे, “शिस्तभंगाच्या रिव्ह्यूनंतर, पीसीबी जाहीर करत आहे की झिम्बाब्वेचा गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी पीएसएलच्या पुढील दोन हंगामांमध्ये सहभागी होण्यास अपात्र आहे. लीगमधील आपली वचनबद्धता पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला. ही कृती त्यांच्या कामातील व्यावसायिक दृष्टिकोन दर्शवते.”
कोलकाता नाईट रायडर्सने ब्लेसिंग मुझारबानीला ७५ लाख रुपयांना विकत घेतलं. त्याने आतापर्यंत आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी दोन सामने खेळून चार बळी घेतले आहेत. भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली आयोजित केलेल्या टी-२० विश्वचषकात मुझारबानीने लक्षणीय छाप पाडली होती, म्हणूनच कोलकाता नाईट रायडर्सने त्याला करारबद्ध केलं.
