मुंबईच्या कुस्तीची कोंडी!

मातीचा वसा घेतलेली कुस्ती जागतिकीकरणाचा ध्यास घेऊन आता मॅटवर पोहोचली. महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्रालयाने आपल्या क्रीडा धोरणात प्रत्येक खेळासाठी एक मॅट देण्याचे ठरवलेही, पण असे असले तरी मुंबई तालीम कुस्ती संघटनेला राज्य सरकारकडून एकही मॅट मिळवता आलेले नाही. सरकार मॅट देत असली तरी मुंबईच्या आखाडय़ांची वाईट अवस्था पाहता मॅट ठेवायला चांगली जागा नसल्यामुळे मुंबईच्या कुस्तीची पुरती कोंडी झालेली आहे.

क्रीडांगणाचे मॅट जागेअभावी शासनाकडेच खितपत पडून
 मातीचा वसा घेतलेली कुस्ती जागतिकीकरणाचा ध्यास घेऊन आता मॅटवर पोहोचली. महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्रालयाने आपल्या क्रीडा धोरणात प्रत्येक खेळासाठी एक मॅट देण्याचे ठरवलेही, पण असे असले तरी मुंबई तालीम कुस्ती संघटनेला राज्य सरकारकडून एकही मॅट मिळवता आलेले नाही. सरकार मॅट देत असली तरी मुंबईच्या आखाडय़ांची वाईट अवस्था पाहता मॅट ठेवायला चांगली जागा नसल्यामुळे मुंबईच्या कुस्तीची पुरती कोंडी झालेली आहे.
कामगार क्रीडा मंडळाच्या विभागीय कुस्ती स्पर्धेत मॅटवर खेळायला मिळणार म्हणून कुस्तीपटू खूश होते. पण स्पर्धेसाठी उपलब्ध असलेले संघटनेचे मॅट मात्र चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे सर्वाचाच हिरमोड झाला.
याविषयी मुंबई शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष शशिकांत देशमुख म्हणाले की, ‘‘राज्य सरकार कुस्तीसाठी लागणारे मॅट देत असले तरी ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही. आमच्याकडे मॅट ठेवायला जागा नाही, असे कारण दर्शवत आम्हाला मॅट नाकारण्यात आले. सध्या आखाडय़ांची परिस्थिती एवढी वाईट आहे की, त्यामध्ये मॅट ठेवता येणार नाहीत, असे आम्हाला सांगण्यात आले.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सध्या मुंबईतील कुस्तीच्या आखाडय़ांची अवस्था खरेच वाईट आहे. काही आखाडय़ांच्या इमारती पडायला आल्या आहेत, तर काही आखाडय़ांच्या जागा धनदांडगे लाटण्याच्या मार्गावर आहेत. सध्या जे काही खेळासाठी होतेय, ते आम्ही आमच्याच पैशांनी करतो. सरकारने आखाडय़ांची दुरवस्था पाहावी आणि त्यासाठी काहीतरी नक्कीच करायला हवे. आखाडे व्यवस्थित झाले, तर आपसूकच मॅटही आम्हाला मिळेल.’’
याबाबत संघटनेचे सरचिटणीस प्रकाश तानवडे म्हणाले की, ‘‘ऑलिम्पिक डोळ्यांसमोर ठेवले तर कुस्ती मॅटवर खेळवायलाच हवी, तसाच प्रयत्न आम्ही करीत आहोत. पण शासनाकडून मान्य होऊनही सोयी-सुविधा आम्हाला मिळत नाही. साधे मॅटसुद्धा आमच्या वाटय़ाला आलेले नाही, आखाडय़ांची अवस्थाही चांगली नाही. सरकारने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर मुंबईतील कुस्ती नक्कीच चांगले खेळाडू देऊ शकेल.’’
शासनाने प्रत्येक जिल्ह्यांना मॅट देण्याची तयारी दाखवली, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे, पण त्यांनी अजूनही मुंबईतील कुस्तीचे आखाडे पाहिलेले नाहीत. मुंबईतील कुस्ती लोप पावत असल्याची चर्चा सुरू आहे, ती खेळाडूंमुळे नाही तर आखाडय़ांमुळे. सध्या सरकार चणे देतेय, पण संघटनेकडे दात नाहीत, अशी एकंदरीत अवस्था आहे.
त्यामुळे सरकारने आखाडय़ांमध्ये सुधारणा केली तर संघटनेला मॅटही मिळेल आणि नवीन कुस्तीपटू राज्यालाच नाही तर देशालाही मिळू शकतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blocking of mumbai wrestsering