BLOG : एकाच संघात हे अकरा हिरे असते तर…

वेगळ्या निकषांवर संघ निवड करण्याचा हा प्रयत्न.

best indian cricket palyers
खेळाडू निवडताना त्याची देशातील आणि देशाबाहेरील कामगिरी, सरासरी, एकहाती सामने जिंकून देण्याची क्षमता, प्रतिस्पर्ध्याचा दर्जा वगैरे निकषांचा उत्तम उहापोह करुन कसोटीतला एक सार्वकालीन श्रेष्ठ भारतीय संघ निवडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला.

cricket-blog-ravi-patki-670x200भारताने नुकताच ५०० वा कसोटी सामना खेळला. त्या निमित्ताने विविध माध्यमांतून भारताचा सार्वकालीन उत्तम कसोटी संघ निवडण्याची एक अतिशय इंट्रेस्टिंग मोहिम हाती घेतली गेली. क्रिकेट रसिकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. अनेक क्रीडा पत्रकार, विश्लेषक, खेळाडू वगैरेंनी सुद्धा त्यात भाग घेउन खूप छान विश्लेषणसमोर आणले. नवा विचार दिला.
खेळाडू निवडताना त्याची देशातील आणि देशाबाहेरील कामगिरी, सरासरी, एकहाती सामने जिंकून देण्याची क्षमता, प्रतिस्पर्ध्याचा दर्जा वगैरे निकषांचा उत्तम उहापोह करुन कसोटीतला एक सार्वकालीन श्रेष्ठ भारतीय संघ निवडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. लावलेल्या निकषांप्रमाणे अनेकांनी निवडलेला संघ मतभेदाला जागा ठेवणारा नव्हता.
ही सार्वकालीन संघ निवड चालू असताना मनात असा विचार आला की धावा करणे, विकेट घेणे, सामने जिंकणे हा क्रिकेटचा स्थायीभाव आहेच पण त्या पलीकडे जाऊन भारताचा असा सार्वकालीन संघ निवडावा ज्यातील खेळाडूंच्या प्रतिभेने खेळाची कला झाली, क्रिकेट प्रेक्षकाचा क्रिकेट रसिक झाला, लाखो मुलांना क्रिकेटने मोहिनी घातली, सर्व वयाचे लोक स्टेडियममध्ये आले, टीव्हीसमोर ठाण मांडून बसले, क्रिकेटच्या प्रेमाने लोक घायाळ झाले, भारतात क्रिकेटधर्म उदयाला आला. म्हणून या वेगळ्या निकषांवर संघ निवड करण्याचा हा प्रयत्न.
अनेक खेळाडूंना परमेश्वराने निसर्गदत्त क्रिकेटची देणगी दिली आहे. म्हणजे हे खेळाडू हृदय, फुफुसाप्रमाणे क्रिकेट घेऊन जन्माला आले. सहजता, शैली, लालित्य या गुणांवर त्यांनी क्रिकेटला नयनरम्य बनवून टाकले. प्रेक्षकाला नुसती सौंदर्यदृष्टी दिली नाही तर क्रिकेटचा मनोहर दृष्टांत दिला.
असे अकरा कलाकार निवडताना फलंदाजीसाठी सहजता आणि शैलीबरोबरच एखादा त्या फलंदाजाची त्याच्या एकटयाचीच मुद्रा असलेला गुणविशेष, शॉट जो क्रिकेट इतिहासात अख्यायिका बनून गेला तो निकष देखील आवर्जून घ्यायचे ठरवले. आणि हे सहा फलंदाज आपोआप समोर उभे राहिले.
१. सुनील गावसकर : फलंदाजीचे सौंदर्य जेवढे चेंडू मारण्यात आहे त्यापेक्षा काकणभर जास्त चेंडू कौशल्याने सोडण्यात आहे. ऑफ स्टंम्पचे इतके बिनचूक ज्ञान असलेला आणि लेंथवर चेंडू अत्यंत आत्मविश्वासाने सोडणारा गावसकर अद्वितीय. बाउन्सरला शेवटपर्यंत बघून सोडणारा, मिसजजमेंटसुद्धा ऐनवेळेस बेमालूमपणे हाताळणारा तो एकटाच. क्लिष्ट तंत्रात सौंदर्य दाखवणाऱ्या गावसकरने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये खेचून आणले. ऑन ड्राइववर त्याने आपले नाव कोरले.
२. वीरेंद्र सेहवाग : हॅंड आय कोऑर्डिनेशनवर ऑन द राईज ऑफ साईडला अशी फलंदाजी पूर्वी कधीही झाली नाही. बॅट स्विंग, चेंडू आणि बॅटच्या भेटण्याची वेळ अद्वितीय. १५० वेगाच्या फास्ट बोलरला किंचित इनसाइड आउट होऊन कव्हर्समधून जमिनीलगत मारलेला ड्राइव्ह ‘अशक्य, अशक्य’ म्हणून डोके हातात धरायला भाग पाडतो.
३. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण : लक्ष्मणच्या हातात बॅट म्हणजे व्हायोलिन वादकाच्या हातातील बो. कसलेला व्हायोलिन वादक ज्या सफाईदारपणे बो फिरवतो आणि स्वररचनांची अदभूत माळ तयार होते त्याचप्रमाणे तितकीच लिलया लक्ष्मणची थर्डमॅन ते फाईनलेग या क्षेत्राला व्यापणारी मनगटी आल्हाददायक फलंदाजी होती. मनगटावर वेळ असते तसे मनगटात टाइमिंग असते हे लक्ष्मणने दाखवले. लेग स्पिनरला स्पिनच्या विरुद्ध मिडविकेट मधून मारलेल्या शॉटवर लक्ष्मणची मोहोर आहे.
४. सचिन तेंडुलकर : लोक सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हवर पागल आहेत. खरे तर सचिनचे तिन शॉट्स अतुलनीय आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह पण तो ऑन द राईज मारलेला (ओवरपिच चेंडू वरचा नव्हे). फास्ट बॉलरला बॅक फूट कव्हर्समधून मारलेला आणि ऐन भरात असताना फास्ट बोलरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर पापणी लवायच्या आत मारलेला पुल. या पुलने सर्वाधिक लोकांना घायाळ केले. कारण त्यात अफाट प्रतिभा होतीच, पण गोलंदाजाला संपवून टाकण्याचे स्टेटमेंट होते. १९९२ ते २००४ या काळात सचिनने क्रिकेटला राष्ट्रीय सन्मानाचे चिन्ह बनवले.
५. गुंडाप्पा विश्वनाथ : क्रिकेटमध्ये एक म्हण आहे. तुम्ही क्रिकेटरसारखे खेळू शकत नसाल तर किमान क्रिकेटरसारखे चालण्याचा प्रयत्न करा. विश्वनाथला चालताना बघण्याकरता, त्याचा स्टान्स बघण्याकरता आम्ही स्टेडियममध्ये जात असू. लेट कट, स्क्वेरकटचा मूळ पुरुष विश्वनाथ हा स्टाईलचा सभ्य सम्राट होता.
६. विराट कोहली : ३६० अंशाचा फलंदाज. चेंडू जलद येणाऱ्या खेळपट्यांवरचा दुर्मिळ भारतीय उस्ताद. ऑस्ट्रेलियन खेळपट्टयांना खिशात घालून फिरणारा, ऑफ साईडला मनगटी फलंदाजीचा नवा अध्याय सुरु करणारा आधुनिक आयकॉन.
७. महेंद्रसिंह धोनी : स्पिनरच्या गोलंदाजीवर अटकळीने आणि चापल्याने असे स्टंपिंग धोनी आधी कोणाकडूनच बघायला मिळाले नाही. कसोटीत उपयुक्त फलंदाज. पण यष्टिरक्षणातील प्रतिभेमुळे या संघात स्थान.
८. कपिल देव : असा आऊटस्विंग भारतात झाला नाही. ऑफ स्टम्पच्या अगदी जवळून बाहेर जाणारा चेंडू फक्त कपिल देव टाकू जाणे. स्फोटक फलंदाजीवर लोक फिदा. कोणत्याही स्थानावरचा सर्वोत्तम नैसर्गिक क्षेत्ररक्षक.
९. झहिर खान : दोन्ही स्विंगचा बादशाह. स्लोवर वनवर स्वत:ची मुद्रा उमटवली.
१०. एरापल्ली प्रसन्ना : न फिरणाऱ्या विकेटवर फ्लाईट आणि लेंथवर फलंदाजाला अलगद वश करणारा ऑफ स्पिनचा जादुगार. आश्विन त्याच्या जवळ पोहोचतोय. (हरभजन अप्रतिम पण प्रसन्ना थोर)
११. बिशन बेदी : विनासायास लाईन पकडणारा आणि ड्रिफ्ट मिळवणारा लेफ्ट आर्म स्पिनचा सम्राट. माशाचे पोहणे आणि बेदीची गोलंदाजी या एकसारख्या सहज प्रक्रिया.
वर लिहिल्या प्रमाणे या संघ निवडीचे मी निकष वेगळे ठेवले आहेत. त्यामुळे इतर अनेक कर्तबगार खेळाडूंना या संघात बसवता आलेले नाही. (अशा वेगळ्या निकषांवर संघ निवडताना देखील अनेकांचे वेगवेगळे चॉईस असू शकतात. त्यांचे स्वागत आहे.) वर काढलेल्या अकरा जणांत गुणवत्ता आणि प्रतिभा असूनसुद्धा या सर्वांनी त्याला कष्टाचे कोंदण दिले, म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली हे खूप महत्त्वाचे आहे.
हे अकरा हिरे एकाच भारतीय संघात असते तर तो रोमांचं अवर्णनीय असता.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blog by ravi patki on best 11 players of indian team

ताज्या बातम्या