प्रीमियर हँडबॉल लीगचे (पीएचएल) पुढील वर्षी मार्चमध्ये आयोजन करण्यात येणार असून, देशात हँडबॉल या क्रीडा प्रकाराचा प्रसार करण्याच्या हेतूने ब्ल्यूस्पोर्ट एन्टरटेन्मेन्ट कंपनीने २४० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रीमियर हँडबॉल लीगचे अधिकृत परवानाधारक असलेल्या ब्ल्यूस्पोर्टने आपल्या हिश्शाची निर्गुंतवणूक केली असून उद्योजक विवेक लोढा आणि अभिनव बंथिया यांना धोरणात्मक गुंतवणूकदार म्हणून समाविष्ट करून घेतले आहे. भारतामध्ये पुढील पाच वर्षांत हँडबॉलचा वेगाने प्रसार व्हावा यासाठी या गुंतवणुकीचा वापर केला जाणार आहे. ब्ल्यूस्पोर्टने याआधीच प्रीमियर हँडबॉल लीगच्या आयोजनाचे हक्क मिळवले आहेत. पुरुष आणि महिला गटासाठी प्रत्येकी १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करतानाच तळागाळात हँडबॉल खेळला जावा यासाठी ३५ कोटी रुपये खर्ची केले जाणार आहेत. कनिष्ठ आणि उप-कनिष्ठ गटातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा, तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘‘हँडबॉल हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे. तसेच भारतात युवकांची मोठी संख्या असल्याने हँडबॉलची देशातील लोकप्रियता वाढत आहे,’’ असे ब्ल्यूस्पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मनू अग्रवाल यांनी सांगितले. हँडबॉल हा खेळ जगभरातील १९० देशांत खेळला जातो. भारतामध्ये सध्याच्या घडीला ८५ हजारांहून अधिक नोंदणीकृत हँडबॉलपटू आहेत.