इंग्लिश प्रीमिअर लीग : स्टोक सिटीचा सहज विजय

स्वान्सीविरुद्धच्या नऊ सामन्यांतील विजयाचा दुष्काळ स्टोकने संपविला.

बोजानने स्टोक सिटीला इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पध्रेतील स्वान्सी सिटीविरुद्धच्या लढतीत १-० असा सोपा विजय मिळवून दिला.

बोजानच्या गोलने स्वान्सी सिटीला नमवले * नऊ सामन्यांतील विजयाचा दुष्काळ संपला
बार्सिलोना आणि रोमा क्लबचा माजी आघाडीपटू बोजानने स्टोक सिटीला इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पध्रेतील स्वान्सी सिटीविरुद्धच्या लढतीत १-० असा सोपा विजय मिळवून दिला. बोजानने सामन्याच्या चौथ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून स्टोकला मिळवून दिलेली आघाडीच निर्णायक ठरली. स्वान्सीला नमवून स्टोकने ईपीएलमध्ये विजयाची हॅट्ट्रिक साजरी करताना गुणतालिकेत ११व्या स्थानावर झेप घेतली आहे.
याचबरोबर स्वान्सीविरुद्धच्या नऊ सामन्यांतील विजयाचा दुष्काळ स्टोकने संपविला. उभय संघात ईपीएलमधील गेल्या नऊ सामन्यांत स्वान्सीने सहा विजय साजरे केले, तर तीन सामने अनिर्णीत राहिले होते. डिसेंबर २०११नंतर स्टोकचा हा स्वान्सीवरील पहिला विजय ठरला. या लढतीत दोन्ही संघात बदल करण्यात आले होते. यजमानांनी गिल्फी सिगुर्डसन आणि कि-संग यूंग यांना अंतिम अकरामध्ये स्थान दिले होते, तर स्टोकला बिराम डीऑफ व जोन वॉल्टर्स यांच्याशिवाय मैदानात उतरावे लागले. स्वान्सीच्या दबावाखाली खेळणाऱ्या स्टोकने चार मिनिटांतच आघाडी घेतली. बोजानने मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून स्टोकला १-० असे आघाडीवर आणले. या गोलने स्टोकवरील दडपण नाहीसे झाले आणि संपूर्ण सामन्यात त्यांनी वरचढ खेळ करताना बाजी मारली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bojan penalty leads stoke city to win over swansea city