क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, अशी इंग्रजांनी या खेळाची ओळख साऱ्यांना करून दिली असली तरी त्यांच्याच देशाचे खेळाडू तसे वागताना दिसत नाहीत. सध्या अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्याच सामन्यातील स्टुअर्ट ब्रॉडचे प्रकरण गाजत आहे. बाद असतानाही ब्रॉड खेळपट्टीवर राहिल्याने त्याच्यावर टीका होत असून काही माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर ‘आपण बाद आहोत हे समजल्यावर मैदान सोडणे किंवा खेळपट्टीवर थांबणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे. पण ब्रॉड स्वत:हून माघारी परतला असता तर त्याला कमीपणा आला नसता,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केले आहे.
पदार्पणवीर अ‍ॅश्टन अ‍ॅगरच्या चेंडूवर ब्रॉड ३७ धावांवर झेलबाद झाल्याचे माहीत असतानाही तो खेळपट्टीवर उभा राहिला. त्यामुळेच त्याच्यावर बंदी आणावी, अशी मागणी वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी केली आहे.
‘‘आपण बाद असल्याचे कळताच, फलंदाज पंचांनी निकाल देण्याच्या आतच मैदान सोडतात. पण मैदानावरच थांबून राहण्याचा ब्रॉडचा निर्णय आयसीसीने पाहावा. वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक दिनेश रामदिनने चुकीच्या झेलसाठी अपील केल्याप्रकरणी स्टुअर्टचे वडील आणि सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी त्याला दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली होती. अखिलाडूवृत्ती करणाऱ्या रामदिनला आयसीसी शिक्षा सुनावत असेल तर ब्रॉडला त्यांनी शिक्षा का करू नये,’’ असा सवाल होल्डिंग यांनी केला होता.
या प्रकरणाबाबत क्लार्क म्हणाला, ‘‘जे काही झाले ते पुन्हा उकरून मला काढायचे नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, ज्यामध्ये चढ-उतार येत असतात. कधी चांगला, तर कधी वाईट काळ असतो. मला नेहमीच असे वाटत आले आहे की, निर्णय घेण्यासाठी पंचांची नियुक्ती केली असून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. जर खेळाडू प्रामाणिक असले असते तर पंचांची गरज भासली नसती. आपण काय करायला हवे, हे प्रत्येकाने ठरवायला हवे. मी कोणाचीही बाजू घेऊ इच्छित नाही. तटस्थपणे मला वाटते की, त्या वेळी जर ब्रॉडला माहिती होते की, आपण बाद आहोत आणि त्यानंतर त्याने मैदान सोडले असते तर त्याला कमीपणा नक्कीच आला नसता.’’
काय आहे वाद?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अ‍ॅशेस सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अ‍ॅश्टन अ‍ॅगरच्या एका चेंडूवर बॅटची कड घेऊन उडालेला झेल मायकेल क्लार्कने पकडला. त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले, पण पाकिस्तानचे पंच अलीम दार यांनी ब्रॉडला नाबाद ठरवले. त्यानंतर मैदानातील मोठय़ा ‘स्क्रीन’वर पुन:प्रक्षेपण होत असताना ब्रॉड बाद असल्याचे सर्वानाच कळले होते. पण आपण बाद आहोत हे स्वच्छपणे दिसत असतानाही ब्रॉडने मैदान सोडले नाही आणि सध्या क्रिकेट वर्तुळात चर्वितचर्वण सुरू आहे.
बनावट ट्विटर खात्यावर गिलख्रिस्ट भडकला
नॉटिंगहॅम : ‘‘माझे कुणीतरी बनावट ‘ट्विटर’ खाते उघडून स्टुअर्ट ब्रॉड प्रकरणावर भाष्य केले आहे. माझ्या मते काही विदेशी प्रसारमाध्यमांचे हे काम असावे. इंटरनेट माध्यमाची मला माहिती असल्याने मी ‘ट्विटर’वर खाते उघडलेले नाही. या गोष्टीचा तपास करून मी दोषींवर कायदेशीर कारवाई करेन,’’ असे ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टने सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कचे परखड मत