एकेकाळचे सहकारी रोहन बोपण्णा आणि महेश भूपती हे एटीपी दुबई अजिंक्यपद टेनिस स्पध्रेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने असणार आहेत. बिगरमानांकित बोपण्णा आणि राजीव राम या जोडीने विक्टर हॅनेस्क्यू आणि लुकास रोसोल यांचे ४-६, ७-५, १०-४ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
भूपती आणि मायकेल लॉड्रा या जोडीने सर्बियाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडच्या चौथ्या मानांकित मारियुस फस्र्टेनबर्ग आणि मार्किन मॅटकोस्की जोडीचा चुरशीच्या लढतीत ४-६, ६-४, १०-८ असा पराभव केला. १०व्या गेममध्ये सर्विस गमवावी लागल्याने भूपती-लॉड्रा जोडीला पहिल्या सेटवर पाणी सोडावे लागले. मात्र दुसऱ्या सेटमध्ये जोमाने पुनरागमन करत त्यांनी तिसऱ्या गेममध्ये प्रतिस्पध्र्याची सर्विस मोडीत काढली. सुपर ट्राय-ब्रेकरमध्ये रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये तिसऱ्या मॅचपॉइंटवर गुण मिळवत त्यांनी आगेकूच केली. एकेरीमध्ये सोमदेव देववर्मनचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील सातव्या स्थानावरील अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने त्याचा पराभव केला.