पीटीआय, कॅनबेरा
सततच्या पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एकादश या संघांमधील गुलाबी चेंडूने होणाऱ्या सराव सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे वाया गेला. या दोनदिवसीय क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी दोन्ही संघांनी ५०-५० षटके फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला गुलाबी चेंडूशी जुळवून घेण्यास फारसा वेळ मिळणार नाही.
बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून अॅडलेड येथे खेळवला जाणार आहे. हा सामना प्रकाशझोतात (डे-नाइट) गुलाबी चेंडूने होणार असून याच्या तयारीसाठी सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कॅनबेरा येथे शनिवारी संततधार कायम राहिल्याने सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेकही होऊ शकले नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्माला काही दिवसांपूर्वीच अपत्यप्राप्ती झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियात उशिराने दाखल झाला आणि त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. तसेच अंगठ्याच्या दुखापतीमुळे शुभमन गिललाही पहिल्या कसोटीत खेळता आले नव्हते. त्यामुळे या दोघांसाठी सराव सामना खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
भारताने मार्च २०२२ मध्ये बंगळूरु येथे श्रीलंकेविरुद्ध अखेरचा ‘डे-नाइट’ कसोटी सामना खेळला होता. त्यातच गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड येथेच झालेल्या ‘डे-नाइट’ कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे भारतीय संघ गुलाबी चेंडूविरुद्ध अधिकाधिक सराव करण्यात उत्सुक आहे. मात्र, आता त्यांना फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी केवळ ५०-५० षटकेच मिळणार आहेत, परंतु त्यासाठीही रविवारी कॅनबेरा येथे पाऊस होणार नाही अशी भारताला आशा करावी लागेल.
हेही वाचा >>>IPL Auction 2025 Sold and Unsold Players List: आयपीएल लिलावातील सोल्ड-अनसोल्ड खेळाडूंची यादी वाचा एकाच क्लिकवर
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली. या वेळी त्यांनी संपूर्ण संघाबरोबर छायाचित्र काढले. तसेच भारतीय संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये जाऊन त्यांनी विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याशी संवादही साधला.