बेकनहॅम : इंग्लंडविरुद्धच्या बहुचर्चित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास केवळ आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असताना भारतीय संघाच्या अपुऱ्या सरावाविषयी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने चिंता व्यक्त केली आहे. तसेच इंग्लंडमधील लहरी वातावरणात वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. मात्र, परिस्थिती अनुकूल असताना वाहवत न जाणे आणि चेंडूवर नियंत्रण राखणे हेच गोलंदाजांसमोरील मोठे आव्हान असेल, असेही मॉर्केल म्हणाला.
भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी त्रिकुटाच्या निवृत्तीमुळे कसोटी संघाला आता युवा शिलेदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. संक्रमणातून जात असलेल्या या संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपविण्यात आले आहे. भारतीय संघ केवळ एक ‘इंट्रास्क्वॉड’ अर्थात आंतरसंघीय सराव खेळून इंग्लंडविरुद्ध मालिकेत उतरणार आहे. यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी यांसारखे काही खेळाडू प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार आहेत.
‘‘आमच्या काही खेळाडूंनी लाल चेंडूने फारसा सराव केलेला नाही. याची थोडी काळजी वाटत आहे. मात्र, इंग्लंडमध्ये दाखल झाल्यापासून तीन दिवसांत आमचे खेळाडू बरीच मेहनत घेत आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास दिसून येत आहे. ही नक्कीच सकारात्मक बाब आहे,’’ असे मॉर्केल म्हणाला.
इंग्लंडमध्ये यश मिळवायचे झाल्यास सातत्याला फार महत्त्व असल्याचे मॉर्केलने अधोरेखित केले. ‘‘इंग्लंडमध्ये खेळताना केवळ कामगिरीत नाही, तर सरावादरम्यान आणि मैदानाबाहेरही तुम्हाला सातत्य राखावे लागते. तुम्हाला यश मिळवून देईल अशी प्रक्रिया शोधून त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येकाची खेळण्याची आणि विचार करण्याची शैली वेगळी असते. आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी काय महत्त्वाचे आहे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा,’’ असेही मॉर्केलने सांगितले.
तसेच इंग्लंडमधील वातावरण वेगवान गोलंदाजीलाच अनुकूल असल्याचे सरावादरम्यान स्पष्ट झाल्याचे मॉर्केल म्हणाला. या परिस्थितीत गोलंदाजीवरील नियंत्रण महत्त्वाचे ठरेल असे त्याला वाटते. तसेच फलंदाजांना आता झगडावे लागत असले, तरी या खेळपट्ट्यांवर खेळण्याचे तंत्र विकसित झाल्यास कसोटी मालिकेत धावा करणे थोडे सोपे जाऊ शकेल असे मॉर्केल म्हणाला. ‘‘सराव करतानाही वेगवान गोलंदाजांना बरीच मदत मिळाली. त्यामुळे फलंदाजांसमोर मोठे आव्हान उपस्थित झाले. मात्र, या आव्हानात्मक परिस्थितीत सराव केल्याचा आमच्या फलंदाजांना प्रत्यक्ष कसोटी मालिकेत फायदा मिळू शकेल,’’ असेही मॉर्केलने नमूद केले.
आईला हृदयविकाराचा झटका; गंभीर तत्काळ मायदेशी
आईला हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडहून तत्काळ मायदेशी परतला आहे. गंभीरची आई सीमा यांना नवी दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या अतिदक्षता विभागात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. भारतीय संघाच्या चारदिवसीय आंतरसंघीय सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. गंभीरच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक रायन डेन दोएशहाते भारतीय संघाला मार्गदर्शन करत असल्याचे समजते. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक त्याला सहाय्य करतील. ‘‘गौतम आणि त्याचे कुटुंबीय गुरुवारी मायदेशी परतले. सर्व काही सुरळीत झाल्यास गौतम पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडमध्ये पुन्हा दाखल होईल,’’ असे ‘बीसीसीआय’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले.
सराव आणि कसोटीतील खेळपट्ट्या भिन्न
इंग्लंडमध्ये दाखल झाल्यापासून भारतीय संघाला वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळावे लागत आहे. मात्र, कसोटी मालिकेत अशाप्रकारच्या खेळपट्ट्या मिळतील याची मॉर्केलला खात्री नाही. ‘‘सरावादरम्यान खेळपट्ट्यांकडून वेगवान गोलंदाजांना बरीच मदत मिळाली. मात्र, २० जूनपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल, तेव्हा खेळपट्ट्या पूर्णपणे भिन्न असतील असा माझा अंदाज आहे. खेळपट्टी सपाट असताना गोलंदाजांची खरी कसोटी लागते. तुमचे कौशल्य आणि गुणवत्ता याची ही परीक्षा असते. तुम्ही या आव्हानासाठी तयार असले पाहिजे हेच मी आमच्या गोलंदाजांना सांगितले आहे,’’ असे मॉर्केल म्हणाला
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटविश्वातून आदरांजली
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना भारतीय संघ, तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांकडून आदरांजली वाहण्यात आली. गुरुवारी एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला भीषण अपघात झाला. यात २४२ प्रवाशांनी प्राण गमावले. इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाने शुक्रवारी सराव सामन्यापूर्वी एक मिनिट शांत उभे राहून, तसेच काळी दंडपट्टी बांधून मृतांना आदरांजली वाहिली. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचे खेळाडूही लॉर्ड्स मैदानावर एक मिनिट शांत उभे राहिले.