इंदूर : गेल्या दोन वर्षांत ट्वेन्टी-२०मधील आपला खेळ सुधारला आहे, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने व्यक्त केले. शार्दूलने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत संघाचे १९वे षटक टाकताना एका षटकात तीन बळी घेतले. हाणामारीच्या षटकांत भारताचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतात, हेच जणू शार्दूलने दाखवून दिले.

‘‘ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या जलद प्रकारात बरेच चढउतार येत असतात. परिणामी ट्वेन्टी-२०मध्ये विचार करून खेळायला वेळ नसतो. सर्व झटपट करावे लागते. त्यातच गेली तीन वर्षे आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट सातत्याने खेळत आहे. त्याचा फायदा मला ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील खेळ सुधारण्यासाठी झाला. त्यातच माझे एका संघातील स्थान पक्के नाही. भारतीय संघात नसलो की मुंबई किंवा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. मात्र माझ्या यशात गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचे मोलाचे योगदान आहे,’’ असे शार्दुलने म्हटले.

शार्दुल ठाकूरने नवदीप सैनीच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. ‘नवदीपचे यॉर्कर पाहण्यासारखे असतात,’ असे शार्दुलने म्हटले.

दुखापतीमुळे इसुरू उडानाची माघार

श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज इसुरू उडाना याने दुखापतीमुळे भारताविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीतून जवळपास माघार घेतली आहे. पाठदुखीमुळे उडानाला दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत गोलंदाजीसाठी उतरता आले नाही. श्रीलंकेला अर्थातच त्याची चांगलीच उणीव भासली. श्रीलंकेला येत्या काही दिवसांत भरपूर क्रिकेट खेळायचे असल्याने उडाना लवकरच तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी व्यक्त केली.