Shreyanka Patil On His Bowling Performance: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलसाठी अतिशय खास ठरला. या सामन्यात गोलंदाजी करताना तिने १८३ धावांचा बचाव करताना मोलाची भूमिका बजावली. तिने पहिल्यांदाच ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
हा सामना झाल्यानंतर बोलताना श्रेयंका पाटील भावुक झाली होती. तिला १४ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. याबाबत बोलताना ती म्हणाली, “हा १४ महिन्यांचा काळ माझ्यासाठी रोलरकोस्टर राईडसारखा होता. मी मैदानाबाहेर शांत बसूच शकत नाही. मला क्रिकेट खेळायला आवडतं. आज मी जे काही केलं त्याचा मला आनंद आहे.”
तसेच सामना झाल्यानंतर बोलताना तिने आपल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. याबाबत बोलताना ती म्हणाली, “मी अशी मुलगी आहे जी शांत बसूच शकत नाही. मला मैदानावर राहायला आणि खेळायला खूप आवडतं. लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळताना, त्यांच्याविरुद्ध खेळताना विकेट घेण्याचे जे चॅलेंज असायचे, त्यानेच आज मला विकेट टेकर गोलंदाज बनवले. मला फक्त धावा रोखणारी गोलंदाज बनायचे नव्हते. तर संघाला कठीण प्रसंगातून काढणारी गोलंदाज बनायचे होते.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय
या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ग्रेस हॅरिसने १७ धावांची खेळी केली. राधा यादवने ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. ऋचा घोषने २८ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. तर नादिन डी क्लार्कने २६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १८२ धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना बेथ मुनीने २७ धावांची खेळी केली. तर भारती फुलमालीने ३९ धावांची खेळी केली. पण श्रेयंका पाटीलने दमदार गोलंदाजी केली. तिने या डावात ५ गडी बाद केले. गुजरातचा डाव १५० धावांवर आटोपला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ३२ धावांनी आपल्या नावावर केला.
