आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तसेच जागतिक रौप्यपदक विजेता भारताचा बॉक्सर अमित पांघल याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. ‘एआयबीए’ने तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच क्रमवारी जाहीर केली.

सहा जागतिक सुवर्णपदकांची मानकरी ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला ५१ किलो वजनी गटात तिसरे स्थान मिळाले आहे. २०१८च्या नवी दिल्ली येथील जागतिक सुवर्णपदक विजेती उत्तर कोरियाची पँग चोल-मी (२३५० गुण) आणि तुर्कीच्या बुसीनाझ काकीरोग्लू (२००० गुण) यांच्यानंतर मेरीने १५०० गुणांची कमाई करत तिसरा क्रमांक पटकावला आहे. जागतिक रौप्यपदक विजेती मंजू राणी हिने ४८ किलो वजनी गटात ११७५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. आसामच्या लव्हलिना बोर्गोहेन, जमुना बोरो आणि शिवा थापा यांनीही क्रमवारीत चांगली झेप घेतली आहे. ६९ किलो गटात लव्हलिनाने तिसरे स्थान पटकावले आहे. ५४ किलो गटात जमुना बोरो पाचव्या स्थानी आहे, तर शिवा थापा याने ६० किलो गटात १६व्या क्रमांकावर मजल मारली आहे. एल. सरिता देवी मात्र ६० किलो गटात २५व्या स्थानी आहे.